लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीची यात्रेला गाऱ्हाणे उतरवण्याच्या कार्यक्रमानंतर आज मंगळवारी सकाळी अपूर्व उत्साहात भक्तीभावाने प्रारंभ झाला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे ही यात्रा साध्या पद्धतीने साजरी केली गेली होती. मात्र यंदा ती मोठ्या प्रमाणात साजरी होत असून भाविकांचा उत्साह ओसंडून वाहताना पहावयास मिळत आहे. या संदर्भात बेळगावला लाईव्हशी बोलताना श्री मंगाई देवी देवस्थान कमिटीचे युवराज चव्हाण म्हणाले की, कोरोनामुळे गेली दोन वर्षे होऊ न शकलेली ही यात्रा यावेळी मोठ्या धुमधडाकात उत्साहाने साजरी केली जात आहे.
सदर यात्रा प्रामुख्याने शेतकरी व विणकारांची यात्रा म्हणून ओळखली जाते. तथापि वडगाव बेळगावसह कर्नाटक महाराष्ट्र गोवा तसेच देश विदेशातून लाखो भाविक यात्रेनिमित्त या ठिकाणी येत असतात. आज यात्रेचा मुख्य दिवस असून पावसाने उसंत घेतल्यामुळे भाविकांचा उत्साह वाढला आहे.
भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून देवस्थान कमिटीतर्फे आवश्यक चोख व्यवस्था करण्यात आली आहे. अचानक एखादा आजार उद्भवल्यास अथवा आरोग्याची तक्रार निर्माण झाल्यास यात्रेच्या ठिकाणी दवाखान्याची सोय करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ही ठेवला गेला आहे असे सांगून भाविकांनी आपल्या लहान मुलांना सांभाळावे व चोरांपासून सावध राहावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
यात्रेच्या कार्यक्रमाबाबत माहिती देताना श्री मंगाई देवीची यात्रा दरवर्षी आषाढ महिन्याच्या अखेरीस भरते. वडगाव परिसरातील भाविकांकडून सदर यात्रेनिमित्त महिनाभर वार पाळले जातात. आज यात्रेच्या मुख्य दिवशी धनगरी ढोल आणि झांज या पारंपारिक वाद्यांच्या निनादात वडगाव मधील प्रमुख गल्ल्यांमधून देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर विधीवत पूजनाच्या कार्यक्रमासह गाऱ्हाणे उतरविले जाईल. तसेच नारळ फोडणे आणि मानकऱ्यांच्या ओटी भरणे कार्यक्रमाद्वारे मुख्य यात्रेला प्रारंभ होईल. मानकऱ्यांच्या ओटी भरणे कार्यक्रम झाल्यानंतर भाविकांना ओटी भरण्यासाठी मंदिर खुले केले जाईल आणि आज दिवसभर हा ओटी भरणे कार्यक्रम सुरू राहील, अशी माहितीही युवराज चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, आज यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे वडगाव येथील श्री मंगाई देवी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. देवीची ओटी भरण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पहावयास मिळत होते. कोरोनामुळे दोन वर्षा खंडानंतर यात्रा भरली असल्यामुळे भाविकांमध्ये अपूर्व उत्साह दिसून येत आहे.
मंदिराच्या ठिकाणी भाविकांना देवीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे. एकच गर्दी होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी बॅरिकेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे. यात्रा कमिटी व महापालिकेकडून श्री मंगाई देवी मंदिर परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.