Tuesday, November 19, 2024

/

गणेशोत्सवा बाबत – असा आहे महामंडळाचा निर्धार

 belgaum

सरकार मार्गदर्शक सूची जारी करून बेळगावच्या सार्वजनिक श्री गणेशोत्सवावर कांही निर्बंध लादले असले तरी यंदाचा सार्वजनिक श्री गणेशोत्सव पूर्वीप्रमाणेच शांततेने मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार बेळगाव मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने व्यक्त केला आहे.

बेळगावच्या सार्वजनिक श्री गणेशोत्सवा संदर्भात राज्य सरकारने एक मार्गदर्शक सूची जारी केली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी यासंदर्भात नुकतीच महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शक सूचीनुसार घातल्या जाणाऱ्या निर्बंधाची माहिती दिली आहे.

यासंदर्भात  बेळगाव लाईव्हशी बोलताना बेळगाव मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, सरकारच्या मार्गदर्शक सूचीनुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) श्री मूर्तींवर बंदी घालण्याबरोबरच साऊंड सिस्टिम डॉल्बी यांच्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र हे निर्बंध शिथिल करण्याची विनंती आम्ही केली आहे. गेल्या कोरोनाच्या संकटाची पूर्वकल्पना नसल्यामुळे गेल्या दोन वर्षात अनेक मंडळांनी गणेश मूर्तीच्या ऑर्डर दिल्या होत्या आणि त्याप्रमाणे मोठ्या मूर्ती तयार झाल्या होत्या. त्यावेळी प्रशासनाने सध्या तुम्ही लहान गणेश मूर्तींद्वारे सण साजरा करा आणि कोरोना निवळल्यानंतर पूर्वी तयार केलेल्या मोठ्या मूर्ती स्थापन करा असे सांगितले होते. मागील वर्षात झालेली ही तडजोड सध्याचे जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना माहित नाही.

Ganesh logo
Ganesh logo

त्यांना आता आम्ही त्याची कल्पना दिली आहे. तेंव्हा सर्व सार्व. गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतेही दडपण न घेता, भीती न बाळगता कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, अरेरावी न करता समाजाचे भान राखून शांततेने पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात उत्साहाने गणेशोत्सव साजरा करावा, असे सांगून कोणतीही अडचण आल्यास मंडळांनी महामंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन कोंडुसकर यांनी केले.Vikas ramakant

महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांनी येत्या 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या दहा दिवसाच्या कालावधीत शहरातील 378 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून यंदा मोठ्या प्रमाणात श्री गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे असे सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी नुकत्याच बोलवल्या बैठकीत सरकारच्या मार्गदर्शक सूचीनुसार घालण्यात आलेल्या निर्बंधाची माहिती देण्यात आली असली तरी ते सर्व निर्बंध आम्ही बैठकीत धुडकावून लावले आहेत. आमचे मत आम्ही ठामपणे मांडले आहे. पीओपी मूर्तीच्या समस्येचा प्रश्न बेळगाव उद्भवतच नाही असे सांगून त्याचे स्पष्टीकरण कलघटगी यांनी दिले. तसेच कोल्हापूर प्रमाणे पाट विरहित श्रीमूर्तीची प्रथा महामंडळाने सुरू केल्याचेही स्पष्ट केले.

गेल्या दोन वर्षात कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करत आम्ही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला आहे. मात्र यंदा सर्वच सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जात असल्यामुळे गणेशोत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल. तेंव्हा प्रशासन आमची बाजू समजून घेऊन आम्हाला सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे, असे विकास कलघटगी म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.