कित्तूर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मितीच्या प्रस्तावात बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून कित्तूर ऐवजी तुमकुरला आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची योजना आखली जात आहे. सदर प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
गेल्या विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर अवजड उद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांनी बेळगाव जवळ कित्तूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीची घोषणा केली होती. मात्र आता या संदर्भातील घोषणेपासून फारकत घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.
बेळगावसह धारवाड येथे विमानतळ आहे, त्याला जोडून कित्तूरला नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मितीची घोषणा मंत्री मुरुगेश निराणी यांनी केली होती. औद्योगिक कॉरिडोरसाठी कित्तूर येथील जमीन संपादित केली जात आहे, या ठिकाणी विमानतळ उभारल्यास बेळगाव आणि धारवाड जिल्ह्याचा अधिक विकास होईल असा दावा मंत्री निराणी यांनी केला होता.
मात्र आता नव्याने उपलब्ध झालेल्या माहितीनुसार कित्तूर ऐवजी तुमकुर जिल्ह्यातील शिरा तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मितीची योजना आखली जात आहे. याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत असून निवडणुकीत स्वार्थ साधनेच्या दृष्टीने मंत्री निराणी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.
दरम्यान कित्तूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ दुसरीकडे निर्माण करण्याची योजना आखण्यात येत असली तरी त्याला आक्षेप घेऊन कित्तूर येथेच आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मितीचा आग्रह धरण्याची तयारी संगोळी रायण्णा संघटनेने केली आहे.