काहेर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स बेळगाव या संस्थेचा ‘न्यास -2022’ हा वार्षिक दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
शहरातील केएलई ऑडिटोरियम येथे आयोजित या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी महापौर विजय मोरे आणि सन्माननीय अतिथी म्हणून ह्युमॅनिटी फाउंडेशनचे कार्यकारी संचालक तानाजी सावंत उपस्थित होते. अध्यक्षस्थानी काहेर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स संस्थेच्या प्राचार्या सुधा रेड्डी या होत्या.
आपल्या समयोचीत भाषणात विजय मोरे यांनी रुग्ण शुश्रूषा सेवा अभ्यासक्रम आणि त्यासाठी उत्कृष्ट नर्सिंग इन्स्टिट्यूट पैकी एक असलेल्या केएलई संस्थेची निवड केल्याबद्दल उपस्थित नर्सिंग विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. आरोग्य सेवा क्षेत्रात नर्सेसची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते असे सांगून त्यांनी नर्सिंग विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
तानाजी सावंत, तलाश हॉटेल गोव्याचे व्यवस्थापकीय संचालक मेरी कीट आदींनीही आपले समयोचीत विचार व्यक्त केले. कार्यक्रमात विजय मोरे आणि तानाजी सावंत यांचा त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे जीएनएम, बीएससी, पीबीबीएससी, एमएससी नर्सिंगच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुधा रेड्डी यांनी नर्सिंग क्षेत्रातील व्यक्तीकडे नेतृत्व करण्याची क्षमता असते असे सांगून या क्षेत्रात विविध प्रकारे मिळणारा वाव आणि संधी याबाबत माहिती दिली. याप्रसंगी केएलई सेंटीनरी कॉलेज ऑफ नर्सिंग येळ्ळूरचे प्राचार्य विक्रांत नेसरी, केएलई स्कूल ऑफ नर्सिंग दांडेलीचे प्राचार्य विनायक पाटील यांच्यासह निमंत्रित आणि नर्सिंग विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रारंभी स्टुडन्ट नर्सिंग कौन्सिलच्या जनरल सेक्रेटरी अयुक्ता गावस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर कौन्सिलच्या सेक्रेटरी डायना सिंड्रेला व्हेगस यांनी सर्वांचे आभार मानले.