उचगाव फाट्यावर असलेल्या स्वागत कमानीच्या बाबतीत कन्नड 60 टक्के, मराठी 40 टक्के नियम लागू करण्यापूर्वी तो नियम सर्वप्रथम सरकारी कार्यालयांवरील नामफलकांच्या बाबतीत लागू करावा. उचगाव स्वागत कमानीच्या बाबतीत दडपशाही करू नये अन्यथा प्रशासनाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल यासारख्या प्रतिक्रिया सध्या उचगाववासियांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
उचगाव फाट्यावर असलेल्या स्वागत कमानीवरील ‘श्री मळेकरणी देवस्थान ग्रामपंचायत उचगावकडून आपले सहर्ष स्वागत -2019’ या ठळक अक्षरातील मराठी मजकुरास प्रशासनाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच 60 टक्के कन्नड आणि 40 टक्के मराठी या नियमाची अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आली असून यासाठी प्रशासनाकडून दबाव आणला जात आहे. तथापि उचगाव ग्रामस्थांनी स्वागत कमानी वरील मजकूर हटविण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हने आज शुक्रवारी उचगाववासियांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना अंकुश पाटील या युवकाने गावात मराठी व कन्नड भाषिक गुणागोविंदाने राहतात. उचगाव हे महाराष्ट्र सीमेपासून अवघ्या 2 कि. मी. अंतरावर असल्यामुळे तसेच उचगाव येथे श्री मळेकरणी देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठी भाषिकांची ये -जा असते. त्यामुळे स्वागत कमानी वरील मजकूर मराठीत असणे आवश्यक आहे. कन्नड नेतेमंडळींकडून जाणीवपूर्वक स्वागत कमानीचा वाद उकरून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे सांगून उचगावात 90 टक्के लोक मराठी भाषिक असल्यामुळे स्वागत कमान ‘जैसे थे’ ठेवावी असे मत अंकुशने व्यक्त केले
गावातील गंगा पाटील तसेच अन्य एका गृहिणीने आम्ही 60 ते 70 टक्के मराठी भाषिक आहोत. आम्हाला कन्नड कळत नाही. त्यामुळे स्वागत कमानीवरून मराठी हटवू नये. आमची कोणत्याही भाषेबद्दल तक्रार नाही मात्र मराठीला प्राधान्य दिले गेले पाहिजे. कन्नड सक्तीसाठी उचगावच्या स्वागत कमानीला हात लावू नये असे सांगून सरकारी कागदपत्रे कन्नडबरोबर मराठी भाषेतही मिळाली पाहिजेत, असे स्पष्ट केले. गावातील ज्येष्ठ नागरिक माधवराव राणे यांनी स्वागत कमानीच्या बाबतीत गावकऱ्यांनी एकजुटीने एकमताने निर्णय घेतला पाहिजे. यासाठी ग्रामपंचायतीने पुन्हा एकवार गावकऱ्यांची बैठक बोलवावी असे सांगितले.
माजी ग्रा. पं. सदस्य शरद होनगेकर व अन्य एका गावकऱ्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना 60 टक्के कन्नड आणि 40 टक्के मराठी हा नियम सर्वप्रथम सरकारी कार्यालयांच्या फलकांवर अंमलात आणला जावा. सरकारी कचेऱ्यांमधील फलक कन्नड बरोबर मराठी भाषेत लिहिले जावेत. त्यानंतर उचगाव स्वागत कमानीच्या बाबतीत कार्यवाही केली जावी. या भागात 100 टक्के मराठी भाषिक लोक असल्यामुळे स्वागत कमानीवरील फलक मराठीतच असणे आवश्यक आहे असे असे सांगून जबरदस्तीने कमानीवरील मराठी हटविण्याचा प्रयत्न झाल्यास प्रशासनाला जनतेच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
60 टक्के कन्नड आणि 40 टक्के मराठी हा नियम सर्वप्रथम सरकारी कार्यालयांच्या फलकांवर अंमलात आणला जावा अशी मागणी माजी ग्राम पंचायत सदस्य शरद होनगेकर यांनी केली तर
कन्नड अक्षरा मोठी आणि मराठी अक्षर लहान करण्यासाठी िल्हा प्रशासनाच्या अधिकार्यांकडून दबाव घातला जात आहे. भागात मराठी बहुसंख्य लोक राहत असल्यामुळे कन्नड पलकाचा अधिक उपयोग होत नाही.राष्ट्रीय पक्ष केवळ राजकीय फायद्यासाठी मराठी लोकांचा वापर करतात त्यांना मराठीचे सोयरसुतक नाही असा आरोप बाळ देसाई यांनी केला.
आम्हाला इतर भाषेची अडचण नाही मात्र मराठी भाषेला हात लावू नये असे मत सौ लाळगे यांनी तर फलका बाबत पंचायतीने निर्णय घेण्यापेक्षा आमदार हेब्बाळकर आणि खासदार मंगला अंगडीनी निर्णय घ्यावा आणि ग्रामपंचायत ने निर्णय घेण्याची जबाबदारी जनतेवर ढकलू नये पंचायतीने निर्णय घ्यावा मागणी ग्रामस्थ माधव राणे यांनी केली.