अंकली रस्तालगत असलेले आपले छोटे दुकान अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याने उध्वस्त झाल्याने आर्थिक संकट कोसळलेले असतानाही पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडीने निघालेल्या वारकऱ्यांना केळ्यांचे वाटप करणाऱ्या रंजना कोळी या महिलेला बेळगावच्या वन टच फाउंडेशनने मदतीचा हात दिला आहे.
रंजना कोळी यांनी केळी वाटपाच्या स्वरूपात वारकऱ्यांना केलेल्या मदतीचे निलजीच्या एका वारकर्याने केलेले चित्रीकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वॉटसअप ग्रुपवर व्हायरल झाले होते.
त्याची दखल घेत ‘वन टच फाऊंडेशन’ जुना गुडसशेड रोड बेळगाव या संस्थेचे अध्यक्ष श्री विठ्ठल फोंडू पाटील यांनी त्वरित अंकली रोड येथे ठिकाणी जाऊन रंजना कोळी यांना एक मोठे प्लास्टिक, (जी .जी. पावले बेळगाव यांचेकडून ), एक महिना पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य (गजानन लोहार, प्रशांत देवण यांचेकडून ) अशी मदत देऊ केली. विठ्ठल पाटील यांच्यापासून प्रेरणा घेऊन हाकेच्या अंतरावरील मांजरी गावातील ‘एकता सोशल फाऊंडेश’ ही संस्थाही रंजना कोळी यांच्या मदतीला धावून आली. त्यांनी तिला रोख रक्कम, छोट्या मुलांना शाळेच्या बॅगा, वह्या, कंपास, पेन पेन्सिल, खाऊ वगैरे देऊ केले.
अचानक मिळालेल्या या मदतीमुळे अडचणीत सापडलेल्या रंजना कोळी यांचे मन हेलावले आणि साश्रूपूर्ण नयनांनी त्यांनी निस्वार्थ मदतीबद्दल वन टच फाउंडेशन आणि एकता सोशल फाउंडेशनचे आभार मानले.
याप्रसंगी वन टच फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील, सदस्य ज्योतेश हुरुडे, अशोक चौगुले, एकता सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप पवार, सदस्य संजय नांद्रे, फारूक तांबोळी, सचिन माने, महेश दाभोळे, तानाजी रोडे, सुरेश मांगलेकर आदी उपस्थित होते.