मुसळधार पावसाळी वातावरणामुळे प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. याखेरीज सध्याच्या वातावरणामुळे शालेय मुलांच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी एक तर शाळांमधील चांचणी परीक्षा पुढे ढकलव्यात अथवा शाळांना सुट्टी जाहीर करावी, अशी जोरदार मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे
मुसळधार पावसाळी वातावरणामुळे प्रशासन एकीकडे धोक्याचा इशारा देत असताना दुसरीकडे शाळा मात्र सुरूच ठेवण्यात आले आहेत. यात भर म्हणून आजपासून काही शाळांमध्ये एफए -वन चांचणी परीक्षेला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर वाढण्याबरोबरच थंडीचे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या प्रतिकूल वातावरणाचा परिणाम लहान मुलांवर होऊ लागला आहे. शाळेला जाणारी मुले सर्दी, खोकला आणि तापामुळे आजारी पडत आहेत.
घराबाहेर धो धो कोसळणारा पाऊस, घरात आजारी मुलं आणि शाळांमध्ये सुरू झालेल्या चांचणी परीक्षा यामुळे पालकवर्गाची चिंता वाढली आहे. संतत धार पावसामधून बळेबळे आजारी मुलांना परीक्षेला पाठवायचे तर त्यांच्या आरोग्याला धोका आणि नाही पाठवले तर आपली मुलं परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याची भीती अशी सध्या पालकांची अवस्था झाली आहे. या खेरीज सर्दी खोकला आणि तापानी त्रस्त आजारी मुलांमुळे वर्गातील इतर सर्व मुलांना संसर्गाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सतत पडणाऱ्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले असून काही ठिकाणी नाले व गटारी तुडुंब भरून वाहत आहेत. लहान मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते धोकादायक बनले आहेत त्याचप्रमाणे कोरोनाचा संसर्ग आता पुन्हा वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर पालकवर्गाला पावसाळी वातावरणात आपल्या मुलांना घराबाहेर शाळेत पाठविणे एकंदरच जोखमीचे वाटू लागले आहे. तरी या संपूर्ण परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी एक तर शाळांमध्ये सुरू असलेल्या चांचणी परीक्षा तात्काळ रद्द करून पुढे ढकलाव्यात किंवा शाळांना सुट्टी जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांकडून केली जात आहे.