बेळगाव तालुक्यातील मुतगा येथील विहिरीत शीरविरहित धड सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मुतगा मुचंडी रोडवरील माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांच्या घण्याच्या शेतातील विहिरीत अंदाजे 30 वर्षे वयाच्या अज्ञात युवकाचा शीर विरहित धड सापडल्याने या परिसरात एकच खळबळ माजली आहे.घटनास्थळी मारिहाळ पोलिसांनी धाव घेतली असून ते विहिरीत सापडलेले धड कुणाचे याचा तपास केला जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुचंडी मुतगा रोड येथे सुनील अष्टेकर यांच्या मालकीचे शेत आहे या शेतातील रस्त्यालगत असलेल्या विहिरीत धड तरंगत होता मंगळवारी सकाळी हे निदर्शनास येताच तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले.
विहीरीत केवळ धड मिळाले असून शीर बेपत्ता आहे धडाच्या पायाला साखळी बांधण्यात आली असून दगडाने धड बांधून पाण्यात फेकून दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर युवकाचा अन्यत्र खून करून शीर दुसरीकडे आणि धड विहिरीत फेकला असल्याचा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे.
रविवारी सकाळी सुनील अष्टेकर हे शेतावर गेले होते विहिरीची त्यांनी पहाणी केली होती मात्र त्यावेळी त्यांना याबद्दल काहीच कल्पना आली नव्हती मात्र तीन दिवसांनी ते धड पाण्यावर आल्याने मंगळवारी सकाळी पोहायला गेलेल्यांच्या नजरेस आले आहे.ते धड कुणाचे आहे? शीर कुठे आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत.