पर्यटकांच्या हुल्लडबाजीला आळा घालण्यासाठी गोकाक धबधब्यासह आता गोडचिनमलकी धबधब्याच्या ठिकाणीही चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संततधार पावसाने घटप्रभा नदी दुधडी वरून वाहत असून हे पाणी येथील धबधब्यांवरून कोसळत आहे निसर्गरम्य सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी गेल्या चार-पाच दिवसांपासून धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे कित्येक जण धबधब्याच्या काठावर जाऊन सेल्फी काढणे, उलटबाजी करणे आदी प्रकार करत असल्यामुळे याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेतली आहे.
पोलिसांनी गोकाकच्या धबधब्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करून हुल्लडबाजीला आवर घातला आहे. आता गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्याकडून गोडचिनमलकी धबधब्याच्या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्याचप्रमाणे पर्यटकांनी सुरक्षित अंतरावरून धबधब्याचा आनंद लुटावा यासाठी काठावर पट्ट्या बांधण्यात आल्या आहेत.
याव्यतिरिक्त धबधब्याच्या ठिकाणी घ्यावयाच्या खबरदारी संदर्भात सूचनाफलक देखील उभारण्यात आला आहे. दरम्यान बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी नुकतीच गोकाक धबधब्यास भेट देऊन तेथील बंदोबस्ताची पाहणी केली होती.
अलमट्टीतून 1 लाख क्युसेक्स पाणी विसर्ग; सतर्कतेचा इशारा
कोकण आणि पश्चिम घाटात पडणारा मुसळधार पाऊस लक्षात घेता अलमट्टी जलाशयात येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून अलमट्टी धरणातून 1,00,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.
सध्या या धरणातून 75 हजार क्युसेक्स पाणी बाहेर सोडण्यात येत आहे. आता हे प्रमाण 1 लाख क्युसेक्सपर्यंत वाढणार असल्यामुळे धरणाच्या खालच्या अंगाला असलेल्या गावांमधील जनतेला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्वांनी सतर्क राहून स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.