येत्या श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी एक खिडकी (सिंगल विंडो) उपक्रम राबविण्यात यावा, डॉल्बी बाबत प्रशासनाने जनजागृती करावी आदी विविध मागण्या बेळगाव मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ आणि लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळातर्फे आज प्रशासनाकडे करण्यात आल्या.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या 10 मे रोजी डीजे, साऊंड सिस्टिम आणि पीओपी मूर्ती या संदर्भात नवी मार्गदर्शक सूची जारी केली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सोमवारी शहरातील मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ आणि लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील हे होते. त्याचप्रमाणे व्यासपीठावर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ संजीव पाटील, मनपा आयुक्त रुद्रेश घाळी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव मंडळाच्या उपस्थित पदाधिकारी व प्रतिनिधींना नव्या मार्गदर्शक सूचीची माहिती दिली.
यावेळी बोलताना बेळगाव मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांनी शहर उपनगरात 378 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. गणेशोत्सवासाठी सध्या या सर्वांच्या मूर्ती तयार झाल्या आहेत. याखेरीज कोरोना काळात बनविण्यात आलेल्या मूर्ती अद्यापही तशाच आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पेण व इतर ठिकाणाहून मूर्तींचे आगमन झाले आहे. त्यामुळे पीओपी बंदीची अंमलबजावणी केल्यास मूर्तिकारांचे मोठे नुकसान होणार आहे. याव्यतिरिक्त बेळगावातील श्रीमूर्ती या मुळात पूर्णपणे पीओपीच्या नसतात असे सांगून त्यामुळे पीओपी संदर्भातील मार्गदर्शक सूचीची अंमलबजावणी पुढील वर्षापासून केली जावी अशी कलघटगी मागणी केली. बैठकीत विकास कलघटगी यांनी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाची आणि कार्यकर्त्यांची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली.
लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी सुनील जाधव यांनी गणेशोत्सवप्रसंगी साऊंड सिस्टिम संदर्भातील परवानगी नियम आदींची कागदपत्रे फक्त कन्नड व इंग्रजीमध्ये न देता मराठी भाषेतूनही मिळावीत. तसेच गेल्या दोन वर्षातील कोरोनाच्या संकटांमुळे आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. परिणामी मंडळांकडे पुरेशी वर्गणी जमा होणे कठीण असल्यामुळे यावेळी हेस्कॉमकडून डिपॉझिटची रक्कम माफ केली जावी, अशी मागणी केली.
येत्या 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2022 या दहा दिवसाच्या कालावधीत शहरात सार्वजनिक श्री गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. तेव्हा तत्पूर्वी शहरातील सर्व रस्ते विशेष करून विसर्जन मिरवणुकीचा मार्ग व्यवस्थित चांगल्या प्रकारे दुरुस्त केला जावा. मंडप परिसर स्वच्छ ठेवला जावा. संबंधित सर्व खात्यांची परवानगी एकाच ठिकाणी मिळून त्यात सुसूत्रता यावी यासाठी एक खिडकी (सिंगल विंडो) योजना सुरू करावी.
ध्वनी प्रदूषणासंदर्भात गेल्या 10 मे रोजी नवीन मार्गदर्शक सूची जारी झाली असून ती सर्वांना लागू असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. प्रशासन त्याला बांधील असले तरी राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी येणाऱ्या आदेश तथा सुचनेनुसार वेळोवेळी बैठका घेऊन यात सुधारणा करता येईल असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी यावेळी सांगितले.
ध्वनी प्रदूषणाची बाब बहुतांश मंडळांनी गांभीर्याने घेतली आहे त्यामुळेच मागील वर्षापासून काही मोजके वगळता उर्वरित सर्व मंडळांनी झांज पथक ढोल पथक लेझीम पथक वगैरे स्थानिक व परगावच्या वाद्यवृंदांना प्राधान्य दिले आहे. तेव्हा डॉल्बी संदर्भातील नव्या नियमावली बाबत प्रशासनाने पोलीस खात्याच्या मदतीने जनजागृती करणे आवश्यक आहे असे सांगून गणेशोत्सवापूर्वी आणखी एक बैठक बोलावून चर्चा करण्यात यावी असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सुचविले. त्याचप्रमाणे लवकरच सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सरकारच्या मार्गदर्शक सूचीची माहिती दिली जाईल असे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, सरचिटणीस महादेव पाटील, सचिव सागर पाटील, गणेश दड्डीकर, नगरसेवक रवी साळुंखे, नितीन जाधव, हेमंत हावळ, राजकुमार खटावकर आदींसह पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी बुडायुक्त प्रीतम नसलापुरे निवासी जिल्हाधिकारी अशोक दूरदुंटी वगैरे वन खाते वगळता पोलीस, हेस्कॉम, प्रदूषण नियंत्रण मंडळ, केएसआरटीसी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.