फेसबुक व इंस्टाग्रामवर युवतीच्या नावाने बनावट खाते उघडून अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना सुमारे 20 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या नाईंग्लज येथील एका ठसेनाला बेळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे.
महांतेश मुडसे (वय 29, रा. नाईंग्लज, ता. चिक्कोडी) असे पोलिसांनी गजाआड केलेल्या ठकसेन युवकाचे नांव आहे. गेल्या तीन वर्षापासून फसवणुकीचा उद्योग करणाऱ्या महांतेश याने अनेक तरुणांना जवळपास 20 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. महांतेश याची पोलीस उपनिरीक्षक होण्यासाठीची तयारी सुरू आहे. त्याने शारीरिक चांचणीही पूर्ण केली आहे. मात्र पोलीस उपनिरीक्षक होण्याआधीच तो फसवणूक प्रकरणात पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
धारवाड येथे राहून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षेची तयारी करीत असताना त्याने एम. स्नेहा असे युवतीच्या नावाने फेसबुक व इंस्टाग्रामवर खाते काढले. याद्वारे त्याने अनेक तरुणांना स्नेहा तिच्या नावे संदेश पाठवून मैत्रीत अडकवले. त्यानंतर त्यांच्याकडून विविध कारणास्तव पैशाची मागणी केली. या पद्धतीने त्याने 19 लाख 80 हजार रुपये इतकी रक्कम उकळली. पैसे घेतल्यानंतर कांही दिवसातच तो संबंधित तरुणाचा नंबर ब्लॉक करून टाकत होता. सावजांना ठकविण्यासाठी त्याने तब्बल सहा बँक खाती उघडली होती. गंडा घातल्यानंतर मिळालेल्या पैशातून गोव्याला जाऊन चैनी करत होता.
ही फसवणूक बिनबोभाट सुरू असली तरी स्वतःची एक चूक महांतेशला भोवली. फेसबुकवर खाते काढताना त्याने डीपीला बेळगावातील एका युवतीचा फोटो ठेवला होता. याची माहिती त्या युवतीला कळाल्यानंतर तिने फेसबुक वरून संदेश देऊन डीपी हटविण्यास सांगितले होते. तरीही तो डीपी बदलला नसल्याने त्या युवतीने बेळगाव शहर सीईएन पोलीस ठाण्यात गेल्या 4 जुलै रोजी तक्रार दाखल केली.
त्यानंतर सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास करून 20 जुलै रोजी महांतेश मूडसे याला ताब्यात घेतले. याप्रकरणी बेळगाव सीईएन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे