महाराष्ट्रात व्यापक प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तेथील कोयना आणि अन्य जलाशयातील वाढत्या पाणी पातळीवर तसेच त्या जलाशयांमधून बाहेर सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर बारीक लक्ष ठेवण्यात आले असून यासंदर्भात निरंतर माहिती मिळणे सोयीचे जावे यासाठी बेळगाव जिल्हा पाटबंधारे खात्याच्या एका अभियंत्यांची खास नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
बेळगाव जिल्हा पाटबंधारे खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंते असणारे एन. एम. दिवटे यांची महाराष्ट्रातील जलाशयांमधील पाणीपातळी आणि जलाशयांमधून होणारा पाण्याचा विसर्ग याची माहिती निरंतर संग्रहित करण्याच्या कामावर नियुक्ती करण्यात आली आहे. सदर अधिकारी महाराष्ट्रातील कृष्णा नदीवर असलेल्या जलाशयांमधील पाणीसाठ्याच्या नोंदी आणि जलाशयातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण याची माहिती निरंतरपणे जिल्हाधिकारी आणि संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत आहेत. महाराष्ट्रात कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून राजापूर बॅरेजच्या ठिकाणी पाणी ओसंडून ओव्हर फ्लो होत असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी नुकतीच दिली आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
*आज -उद्या शाळांना सुट्टी*
दरम्यान, मुसळधार पावसाचा कहर सुरूच असल्यामुळे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगाव शहर आणि तालुक्यासह खानापूर तालुक्यातील शाळांना आज शुक्रवारी आणि उद्या शनिवार दि 16 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
शहरातील अन्नपूर्णेश्वरीनगर आणि केशवनगर पूरग्रस्त झाले असून येथील अनेक घरात पाणी शिरले आहे. पूरग्रस्तांना आसरा मिळावा यासाठी बेळगाव महापालिकेने शहराच्या विविध भागात 19 काळजी केंद्रे (रिलीफ सेंटर्स) सुरू केली आहेत. शहरात मुसळधार पावसामुळे कांही घरे कोसळली असून या घरांमधील नागरिकांना रिलीफ सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. या रिलीफ सेंटरमध्ये नागरिकांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासह शौचालय, स्वच्छतागृह, पाणी, ब्लॅंकेट आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील महापालिकेच्या रिलीफ सेंटरची यादी पुढीलप्रमाणे आहे.
महांतेश भवन महांतेशनगर, आंबेडकर भवन नेहरूनगर, सुखशांती भवन उद्यमबाग, जयवंती मंगल कार्यालय खासबाग, विद्याधिराज भवन, धर्मनाथ भवन, आदिनाथ भवन अनगोळ, जेल स्कूल वडगाव, अन्नपूर्णेश्वरी मंगल कार्यालय वडगाव, कैवल्य योगाश्रम मंडोळी रोड, साई भवन खासबाग, दैवज्ञ मंगल कार्यालय शहापूर, गेस्ट हाऊस कोनवाळ गल्ली, केपीटीसीएल हॉल, बालभवन माळ मारुती, कम्युनिटी हॉल रामतीर्थनगर, वाल्मिकी भवन यमुनापूर.
खानापूर तालुक्यातील अलात्रा तलाव तुडुंब भरून ओसंडून वाहत असल्यामुळे हेम्माड मार्गे जाणाऱ्या खानापूर -गोवा रस्त्याचा कांही भाग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे.