पंतप्रधान नरेंद्र मोदी आयटी, ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना त्रास देत आहे देशात मोदी सरकार हुकूमशाही राबवत आहे असा आरोप काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष एम बी पाटील यांनी केला आहे.
बेळगाव शहरातील काँग्रेस भवन येथे आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. भाजप सरकारवर जोरदार टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आयटी, ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधी पक्षांना त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशभरात या विरोधात निषेध व्यक्त होत असून आज राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या विरोधात आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नेहरू आणि गांधी घराण्याचा इतिहास मोठा असून या कुटुंबांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे नॅशनल हेरॉल्ड हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेल्या वृत्तपत्र होते.
या वृत्तपत्राच्या माध्यमातून देशातील जनतेला संदेश देण्यात येत होता. कालांतराने हे वृत्तपत्र आर्थिक अडचणीत आले. काँग्रेसकडून आलेल्या 90 कोटी रुपये निधीचा वापर वृत्तपत्र कर्मचाऱ्यांसह इतर खर्चासाठी वापरण्यात आला. मात्र याबाबत एकही एफआयआर दाखल नसताना आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना त्रास देण्याचे सत्र सुरू असून ही भाजपची हुकूमशाही आहे, असा आरोप एम. बी. पाटील यांनी केला.
भाजप सरकारच्या कमिशन प्रकरणासंदर्भात टीका करताना कर्नाटकातील कंत्राटदार आणि पंतप्रधानांना पत्र लिहूनही संबंधित नेत्यावर आयटी, ईडी, सीबीआय धाड टाकण्यात आली नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. भाजप राष्ट्रीय पक्षाकडून काँग्रेसला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र याला काँग्रेस कदापिही घाबरणार नाही. भाजपकडून होणाऱ्या व्देशाच्या राजकारणाचा काँग्रेस निषेध करत असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना एम. बी. पाटील म्हणाले अच्छे दिन आणण्याचे आश्वासन मोदींनी दिले असले तरी आता जनतेला दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. जीएसटीमधून तांदूळ आणि दुधाला देखील सोडलेले नाही. जनता मेली तरी चालेल परंतु जीएसटी द्यावाच लागेल.
जनता जगूही शकत नाही आणि मरूही शकत नाही, अशी परिस्थिती भाजप सरकारने निर्माण केली आहे. एकीकडे अंदानी, अंबानी यासारखे उद्योगपती मोठेच होत आहेत, तर दुसरीकडे देशाची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. आता जनता असे ‘अच्छे दिन’ आपल्याला नकोत असा टाहो फोडत असल्याचेही पाटील म्हणाले.
राज्यातील बेकायदेशीर घडामोडींवर देखील एम. बी. पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून पोलीस भरती, संतोष पाटील प्रकरणात मंत्री ईश्वरप्पा यांना देण्यात आलेली क्लीन चीट, अग्निपथ योजना या साऱ्यांवर त्यांनी टीका केली. भाजपचे हे वाईट सरकार जाऊन पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
त्या अनुषंगाने आगामी निवडणुकीत 140 जागांचे काँग्रेसचे लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस माजी मंत्री विनय कुलकर्णी, आमदार अंजली निंबाळकर, माजी आमदार फिरोज शेठ आदींसह अन्य काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.