सामाजिक कार्यकर्ते आणि सेवाभावी संघटनांचे प्रयत्न आणि बेळगाव लाईव्हने उठवलेला आवाज यामुळे आरपीडी क्रॉस येथील सातत्याने तुंबणाऱ्या त्या गटारीची अखेर दखल महापालिकेने घेतली असून आज गुरुवारी या गटारीची साफसफाई सुरू झाली आहे.
आरपीडी क्रॉस येथील एका बाजूची गटार गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने तुंबून राहत आहे. या तुंबलेल्या गटारीमुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरण्याबरोबरच डासं माशांचा प्रादुर्भाव होत होता. सदर गटारीची स्वच्छता केली जावी यासाठी स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नव्हती.
अलीकडेच एका सेवाभावी संघटनेने सदर तुंबलेल्या गटारीच्या ठिकाणी जे डबके निर्माण झाले होते त्या ठिकाणी रंगबिरंगी फुगे लावून गांधीगिरी करण्याद्वारे प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे वेधण्याचा प्रयत्न केला होता. सातत्याने तुंबून आसपासच्या नागरिक व दुकानदारांना मनस्ताप देणाऱ्या आणि आरपीडी क्रॉस येथे अस्वच्छता निर्माण करणाऱ्या या गटारी संदर्भात बेळगाव लाईव्हने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न चालविला होता.
नुकतेच पावसामुळे सदर गटारीतील सांडपाणी रस्त्यावर ओसंडून वाहत असल्यामुळे ये -जा करणाऱ्या नागरिकांना विशेष करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. सदर वृतदेखील बेळगाव लाईव्हने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन आता कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.
बेळगाव लाईव्हसह संबंधित सामाजिक कार्यकर्ते आणि सेवाभावी संघटनांच्या प्रयत्नांना आता यश आले असून सदर गटारीचे साफसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. आज गुरुवारी महापालिकेने टँकरमध्ये सांडपाणी खेचून आरपीडी क्रॉस येथील संबंधित गटार स्वच्छतेचे काम हाती घेतले.
गेल्या बऱ्याच वर्षापासून सदर गटारीमध्ये तुंबणाऱ्या सांडपाण्याचा सर्वांनाच त्रास होत होता. मात्र आता महापालिकेने गटार स्वच्छतेचे काम हाती घेतल्याने परिसरातील नागरिक आणि दुकानदारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.