नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेताना महापालिकेच्या मोकाट कुत्री पकडणाऱ्या पथकाकडून आज सकाळी शहरातील शास्त्रीनगर, गुडशेड रोड परिसरात मोहीम राबवून 4 मोकाट उपद्रवी कुत्री पकडण्यात आली.
शहरातील सर्पमित्र व पशुप्रेमी गणेश दड्डीकर यांच्या पुढाकारामुळे उपरोक्त मोहीम राबविली गेली. शास्त्रीनगर, गुडशेड रोड परिसरातील मोकाट कुत्र्यांमुळे त्रास सहन करावा लागत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी दड्डीकर यांच्याकडे आल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेऊन त्यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केल्यामुळे आज सोमवारी सकाळी महापालिकेचे मोकाट कुत्री पकडणारे पथक शास्त्रीनगर, गुडशेड रोड परिसरात दाखल झाले आणि त्यांनी आपल्या पद्धतीने 4 उपद्रवी कुत्र्यांना पकडून त्यांची त्या भागातून उचल बांगडी केली.
शास्त्रीनगर, गुडशेड रोड परिसरात अलीकडच्या काळात मोकाट बेवारस कुत्र्यांचा त्रास वाढला होता. सदर कुत्री स्थानिक रहिवाशांना कांही करत नसली तरी बाहेरून या भागात येणाऱ्या लोकांना त्यांचा त्रास सहन करावा लागत होता. सदर कुत्र्यांमुळे विशेष करून या भागात शिकवणीसाठी येणाऱ्या मुलामुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
जोरजोराने भुंकत अचानक अंगावर धावून जाऊन मागे लागत लागणारी ही मोकाट कुत्री धोकादायक बनली होती. त्यामुळे महापालिकेकडून आज सकाळी या भागात कुत्री पकडण्याची मोहीम राबवून 4 धोकादायक कुत्र्यांना पकडण्यात आले. या कारवाईमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे.