बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री यल्लमा (रेणुका) देवस्थानाच्या विकास करण्यात येणार असून त्यासाठी 26 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतीच यासंदर्भात बैठक घेऊन चर्चा केली.
बेंगलोर विधानसौध येथे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवस्थानाच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यात आली. देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी अहवाल तयार करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
देवस्थानाच्या निवासासाठी 400 खोऱ्या बांधण्यात येणार असून आणखी 200 खोल्या वाढवाव्यात अशी सूचना त्यांनी केली. अन्नदासोहकेंद्र निवासी समुदाय अंतर्गत सुरू करण्यात यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यल्लमा डोंगर परिसरात 1 लाख 20 हजार चौरस फुटाचे गृहसंकुल, स्नानगृह, शौचालय बांधकाम यासह दर्शनासाठी मंदिरात दोन स्वतंत्र रांगा तयार कराव्यात. त्यापैकी एका रांगेत विशेष दर्शनासाठी परवानगी द्यावी.
मंदिराच्या आजूबाजूला तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था आणि फुटपाथ विकसित करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बैठकीत केली.
त्याचप्रमाणे या सर्व विकासकामांसाठी 26 कोटी रुपये खर्च करण्याचे बैठकीत ठरले. बैठकीस आमदार आनंद मामनी आणि श्री यल्लमा देवस्थान व्यवस्थापन मंडळाचे सदस्य उपस्थित होते.