बेळगाव ते चोरला दरम्यानचा रस्ता संपूर्णपणे खराब झाला असून या रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती केली जावी, अशी मागणी शहरातील प्रभाग क्रमांक 27 चे नगरसेवक रवी महादेव साळुंखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नगरसेवक रवी साळुंखे यांनी आज मंगळवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सादर केले. निवेदन सादर करतेवेळी नगरसेवक साळुंखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बेळगाव ते चोरला दरम्यानच्या खराब झालेल्या रस्त्याची थोडक्यात माहिती दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव ते चोरला दरम्यानचा गोव्याकडे जाणारा प्रमुख रस्ता संपूर्णपणे खराब झाला आहे. गोवा आणि बेळगावातील सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक आणि उद्योजक हे या रस्त्यावरून नेहमी प्रवास करत असतात. मात्र अलीकडच्या काळात खराब झालेल्या या रस्त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना मोठा त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर पडलेले खाचखळगे व खड्डयांमुळे अपघात घडत असून वाहनांचेही नुकसान होत आहे. सदर रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे गोव्यातील नागरिकांनी खरेदीसाठी बेळगाव येणे बंद केले आहे.
याचा परिणाम बेळगाव शहरातील बाजारपेठेवर झाला आहे. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन कृपया आपण स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून या रस्त्याची दुरावस्था जाणून घ्यावी आणि तात्काळ बेळगाव -जांबोटी कुंणकुंबी चोरला रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशा तपशील नगरसेवक रवी साळुंखे यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.
बेळगाव हुन दररोज शेकडो गाड्या भाजीपाला आणि इतर सामुग्री घेऊन गोव्याकडे जात असतात तर गोव्याहून बेळगावला खरेदीसाठी आणि इतर कामासाठी येत असतात त्यामुळे याचा त्रास सहन करावा लागत आहे.कुणकुंबी ते गोवा सीमा पर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे लहान मोठ्या अपघातात वाढ झाली आहे.ऐन पावसात धुक्यात वाढ झाली त्यामुळे वाहन धारकांना खड्डे निदर्शनास येत नाहीत या शिवाय सुरक्षा फलकांचा देखील अभाव आहे यासाठी हा रस्ता त्वरित दुरुस्त करा अशी मागणी वाढली आहे.