कोकण प्रदेशासह महाराष्ट्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जलाशयात येणाऱ्या पाण्याचा इनफ्लो वाढल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील हिडकल, अलमट्टी या प्रमुख जलाशयांचे दरवाजे उघडण्याबरोबरच हिप्परगी बॅरेज, राजापूर बॅरेज, कल्लोळ बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख जलाशय आणि बॅरेजमधील आज शुक्रवारी सकाळी नोंद झालेली पाण्याची स्थिती पुढील प्रमाणे आहे.
जिल्ह्यातील घटप्रभा येथील 51 टीएमसी पाणीसाठा क्षमतेच्या राजा लखमगौडा जलाशय अर्थात हिडकल जलाशयाची पाणी पातळी आज शुक्रवारी 2132.200 फूट झाली असून जलाशयामध्ये 25,726 क्यूसेक्स इतके पाणी येत आहे. या जलाशयाचा आऊटफ्लो सुरू झाला असून एकूण 119 क्यूसेक्स पाणी बाहेर सोडण्यात येत आहे. धूपदाळ येथील बंधाऱ्याच्या ठिकाणी आज 13320 क्यूसेक्स इतका पाण्याचा इनफ्लो होत आहे. या बंधार्यातून गोकाकनजीक लोळसुर ब्रिज येथे घटप्रभा नदीत 11417 क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील कोयना जलाशयाची पाणी पातळी आज शुक्रवारी सकाळी 8 वाजता 2103.10 फूट (641.248 मी.) इतकी नोंदविली गेली आहे. या जलाशयाची पाणीसाठा क्षमता 44.05 (44.7 टक्के) टीएमसी इतकी असून सध्या या जलाशयात 46,450 क्यूसेक्स म्हणजे सुमारे 3.87 टीएमसी पाणी येत आहे, इनफ्लो सुरू आहे. त्याचप्रमाणे जलाशयाचा आऊट फ्लो अर्थात पाणी विसर्ग 2100 क्यूसेक्स इतका आहे. कोयना, नवजा आणि महाबळेश्वर या ठिकाणी आज अनुक्रमे 107 मि.मी., 59 मि. मी. व 143 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे
अलमट्टी जलाशयाची पाणी पातळी सध्या 517.25 मी. इतकी आहे. या जलाशयामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 1,21,029 क्यूसेक्स पाणी येत असून सरासरी 1,25,000 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अलमट्टी जलाशयाची जास्तीत जास्त पाणी साठा क्षमता 123.01 टीएमसी असून आज सकाळी 8 वाजता 87.610 टीएमसी (71.22 टक्के) इतका पाणीसाठा नोंद झाला आहे.
आज शुक्रवारी 8 वाजता नोंद झालेल्या माहितीनुसार हिप्परगी बॅरेजमध्ये 121000 क्यूसेक्स इतका पाण्याचा इनफ्लो आहे. बॅरेजची पाणी पातळी सध्या 522.20 मी. इतकी असून बॅरेजचा आऊटफ्लो मात्र अद्याप सुरू झालेला नाही. मलप्रभा (रेणुका सागर) जलाशयामध्ये आज 14,939 क्यूसेक्स इतका इन्फ्लो तर 194 केसेस इतका आऊटफ्लो सुरू आहे. सध्या या जलाशयाची पाणी पातळी 2064.0 फूट इतकी आहे. राजापूर बॅरेजमधून आज सकाळी 8 वाजता 99417 क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्याचप्रमाणे दूधगंगामधून 27280 क्यूसेक्स आणि कृष्णा नदीवरील कल्लोळ बॅरेजमधून 126697 क्यूसेक्स इतके पाणी बाहेर सोडण्यात येत होते.