मुसळधार पावसामुळे चव्हाट गल्ली परिसरात सध्या नळाचे पिण्याचे पाणी गढूळ येऊ लागले आहे. त्यामुळे आजारपण येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हे पाणी उकळवून थंड करून गाळून प्यावे, असे जाहीर आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी केले आहे.
गेल्यात कांही दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तुडुंब भरलेल्या राकसकोप व हिडकल जलाशयातील पाणी ढवळून निघाले आहे. परिणामी जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया होऊन देखील सध्या चव्हाट गल्लीसह शहरात नळावाटे येणारे पिण्याचे पाणी गढूळ येऊ लागले आहे.
सदर पाण्याचा गढूळ रंग पाहता ते प्यायल्याने आपले कुटुंबीय, लहान मुले आजारी पडण्याची शक्यता असल्यामुळे सध्या नागरिक या पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्यास कचरत आहेत. यासाठी खबरदारी म्हणून नागरिकांनी नळाचे पिण्याचे पाणी चांगले उकळवून थंड करून गाळून वापरात आणावे, असे आवाहन चव्हाट गल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी केले आहे.
पावसाळ्यात नळाच्या येणारे पिण्याचे पाणी काहीसे गढूळ स्वरूपात येत असते सदर पाणी जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया होऊन आलेले असले तरी नागरिकात पाणी प्यावे की नाही असा संभ्रम निर्माण होत असतो.
या पार्श्वभूमीवर दरवर्षी महापालिका आणि आरोग्य खात्याकडून वेळोवेळी पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले जात असते. अलीकडे एल अँड टी कंपनीने बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी घेतली आहे.
तथापि या कंपनीसह महापालिकेने पिण्याच्या पाण्याच्या वापराबाबत अद्याप नागरिकांना मार्गदर्शन केले नसल्याचे लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना वरीलप्रमाणे जाहीर आवाहन केले आहे.