Monday, November 18, 2024

/

एकाच रस्त्यांवर मनपा, स्मार्ट सिटीकडून कोट्यावधी रु. खर्च

 belgaum

बेळगाव महापालिकेकडून शहरातील धर्मनाथ भवन सर्कलला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करून 2016 मध्ये त्याचा विकास साधण्यात आला आहे. तथापि धक्कादायक गोष्ट ही आहे की बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने त्याच वर्षी याच रस्त्यावर सुमारे 47 कोटी रुपये खर्चून व्हाईट टॉपिंग करण्याचे काम हाती घेतले असून जे अद्यापही सुरू आहे.

बेळगाव महापालिकेने केली हॉस्पिटल ते शेख होमिओपॅथी कॉलेज पर्यंतच्या रस्त्याचे 69.51 लाख रुपये खर्च करून डांबरीकरण केले आहे. त्याचप्रमाणे 53.81 लाख खर्च करून धर्मनाथ सर्कल ते ईएसआय हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता आणि 57.55 लाख रुपये खर्च करून धर्मनाथ सर्कल ते श्रीनगर गार्डन पर्यंतच्या रस्त्याचे विकास काम केले आहे.

महापालिकेच्या तिसऱ्या टप्प्यातील 100 कोटी रुपयांच्या मुख्यमंत्री निधीतून गेल्या एप्रिल 2016 ते जानेवारी 2018 या कालावधीत ही विकास कामे करण्यात आली आहेत. मात्र धक्कादायक बाब ही आहे की बेळगाव महापालिकेने पुन्हा व्हाईट टॉपिंग म्हणून विकासाच्या नांवाखाली हे रस्ते 2018 मध्ये हस्तांतरित केले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या मंजुरीनंतर बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने ‘स्मार्ट रोड पॅकेज 01’ या नांवाखाली कांही वाढीव विकास कामाचा अंतर्भाव करून हेच रस्ते विकासासाठी ताब्यात घेतले आहेत. धर्मनाथ भवन रोडसह संबंधित रस्त्यांची विकास कामे अद्यापही सुरू आहेत. नव्याने विकसित केलेले रस्ते किमान 4 ते 5 वर्षे सुस्थितीत राहावे अशी जनतेची अपेक्षा असते. मात्र संबंधित रस्त्यांचा विकास झालेला असताना अवघ्या कांही महिन्यातच पुन्हा त्याच रस्त्यांचा विकास साधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यावरून सदर रस्त्यांच्या बाबतीत प्रशासन भलतेच घाईत असल्याचे दिसून येते.Dharmnath circle road

तथापि हा सर्व प्रकार पाहता पूर्वीचे विकासकाम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळेच की काय अवघ्या कांही महिन्यात पुन्हा या रस्त्यांचे विकास काम हाती घेण्यात तर आले नसावे ना? व्यवस्थित चांगला तयार करण्यात आलेला रस्त्याची पुन्हा नासधूस करण्याद्वारे प्रशासन संबंधित कंत्राटदाराला आर्थिक मदत तर करत नाही ना? असे प्रश्न शहरवासीयांना पडू लागले आहेत. विकसित झालेल्या रस्त्यांचा पुन्हा विकास करण्याचा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या प्रकारावरून निधीचा एकंदर गैरवापरच केला जात आहे हे स्पष्ट होते. उपरोक्त रस्ते हे फक्त एक उदाहरण असून तसे पाहता शहरात बऱ्याच ठिकाणी विकास कामांच्या नांवाखाली असाच प्रकार घडत आहे.

दरम्यान, बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी यांनी स्मार्ट सिटी फोरम आणि बोर्डाने या रस्त्यांच्या विकासाची योजना आखून मंजुरी दिल्यानंतरच त्यांची कामे स्मार्ट सिटीने हाती घेतली आहेत. या रस्त्यांवर सायकल ट्रॅक, युजीडी, स्मार्ट लाईट्स आदी विकास कामे राबविण्यात येत आहेत, असे सांगितले आहे. या उलट मनपा आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांनी संबंधित रस्त्यांच्या पूर्वी झालेल्या विकास कामांची आपल्याला कल्पना नसून आपण त्याची सत्यता पडताळून पाहणार आहोत असे स्पष्ट केले आहे.

News courtasy; the new indian express

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.