पावसाचा जोर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून शहराच्या दक्षिण व उत्तर भागासाठी स्वतंत्र आपत्ती निवारण पथके स्थापन करण्यात आली आहेत. याखेरीज मुख्य कार्यालयातील हेल्पलाइन कक्ष 24 तास सतर्क ठेवण्यात आला आहे.
पावसामुळे शहरात कोणतीही समस्या निर्माण झाल्यास नागरिकांनी मुख्य कार्यालयातील हेल्पलाईन किंवा आपत्ती निवारण पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. आपत्तीजनक स्थिती निर्माण झाल्यास महापालिकेतील 0831 -2405337 किंवा 0831 -2405316 या हेल्पलाइन क्रमांकावर नागरिकांना मदत उपलब्ध होणार आहे.
आपत्ती निवारण पथकाचे प्रमुख म्हणून उत्तर विभागासाठी शहर अभियंते अनंत पद्मनाभ यांची, तर दक्षिण विभागासाठी व्ही. एम. हिरेमठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित विभागातील सहाय्यक कार्यकारी अभियंते कनिष्ठ अभियंते सहाय्यक अभियंते आरोग्य व महसूल निरीक्षक यांचा समावेश आपत्ती निवारण पथकामध्ये असणार आहे. या सर्वांना इलेक्ट्रिक विभागाचे प्रमुख आनंद देशपांडे यांचे सहकार्य लाभणार आहे.
बेळगाव दक्षिण आणि उत्तर विभाग आपत्ती निवारण पथकाचे हेल्पलाइन नंबर पुढील प्रमाणे आहेत. दक्षिण विभाग : 0831 -2405308, 0831 -2436960, 9481504229. उत्तर विभाग : 0831 -2405337, 0831 -2436960, 9481504229.