राज्यातील सर्व निगम मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्षांचे तात्काळ राजीनामे घ्यावेत या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करताना सरकारच्या मुख्य सचिवांच्या स्वीय सचिवांनी राज्यातील अनेक निगम मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पद रद्द करण्याचा आदेश बजावला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील तिघे नेते निगम मंडळाचे अध्यक्ष होते. या तिघांपैकी दोघाजणांची पद रद्द करण्यात आली असून आमदार महेश कुमठळ्ळी यांचे एकट्याचे अध्यक्षपद अबाधित राहिले आहे.
काडा निगमचे अध्यक्ष बैलहोंगलचे माजी आमदार डॉ. व्ही. आय. पाटील आणि अल्पसंख्यांक निगमचे अध्यक्ष मुक्तार पठाण या दोघांचे अध्यक्ष पद रद्द करण्यात आले आहे. अथणीचे आमदार महेश कुमठळी हे मात्र पाणीपुरवठा मंडळाच्या अध्यक्षपदावर पुढे कार्यरत राहणार आहेत.
राज्य पातळीवरील निगम मंडळांची अध्यक्षपदे रद्द करण्यात आली आहेत. बेळगाव बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर यांना सरकारच्या मुख्य सचिवांनी काढलेला आदेश लागू होत नाही. काडा अध्यक्ष भाजप नेते मल्लिकार्जुन तुबाची यांच्या पदाबाबत निश्चित समजू शकलेले नाही.
कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांचे स्वीय सचिव एम. उमेश शास्त्री यांनी उपरोक्त आदेश बजावला आहे.