मला 100 शक्तिशाली पुरुष द्याल तर मी देशाचे शक्तिशाली देशात रूपांतर करेन, असे स्वामी विवेकानंद म्हणाले होते, या महान तक्तज्ञानी माणसाचा आदर्श घेऊन बेळगाव शहरात आजपासून प्रभाग पातळीवर नागरी समित्या स्थापन करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
बेंगलोर, मंगळूर, तुमकुर, हुबळी -धारवाड यांनी जागरूक सामाजिक कार्याची आवड असलेल्या नागरिकांच्या वार्ड कमिट्या अर्थात प्रभाग वार समित्या स्थापन करण्यात पुढाकार घेतला आहे. कायद्यानुसार प्रभागातील समस्याचे निवारण करण्यासाठी प्रत्येक शहराच्या महापालिकेने नागरिकांच्या प्रभागवार समित्या नेमणे आवश्यक आहे.
यामुळे प्रशासनाचे काम देखील हलके होते. विकासाच्या दृष्टिकोनातून बेळगाव शहरातील नागरिक आणि सरकारसाठी तर ही बाब अत्यंत गरजेची बनली आहे. बेळगावमध्ये प्रभाग वार समित्या नेमण्यासाठी नागरिकांच्या पुढाकाराची गरज आहे.
बेळगावातील ही गरज लक्षात घेऊन प्रत्यक्ष सामाजिक कार्य करणाऱ्या कांही जागरूक मंडळींनी आज सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेअंती शहरातील 58 प्रभागांमध्ये या पद्धतीने प्रभाग वार कार्य करण्यासाठी 600 नागरिकांची गरज असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.
प्रभाग वार समितीमधील हे नागरिक स्थानिक नगरसेवकांच्या बरोबरीने प्रभागातील समस्या सोडवून विकास कामं राबविण्यासाठी प्रयत्नशील राहतील. तरी या संदर्भात अधिक माहितीसाठी सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या आपल्या प्रभागाचा विकास करू इच्छिणाऱ्यांनी गौरी गजबर (9449029303) किंवा राहुल पाटील (9379116027) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.