गेल्या पंधरा दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी चक्क बेंगलोर येथून बेळगाव येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कॅन्टोन्मेंट भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची व्यवस्था केल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
बेंगलोर येथे एका बैठकीत असताना काल बुधवारी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके कॅम्प येथील रहिवाशांचा फोन आला आणि त्यांनी आपल्या भागातील पाणीपुरवठा गेल्या 15 दिवसांपासून बंद असल्याची तक्रार आमदारांकडे केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन आमदार बेनके यांनी तात्काळ बेळगावच्या एल अँड टी कंपनी आणि बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड सीईओ यांच्याशी संपर्क साधून कॅन्टोन्मेंट भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना केली.
त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या ऑफिस कर्मचाऱ्यांना आज गुरुवारी स्वतः जाऊन कॅन्टोन्मेंट सीईओ, एल अँड टी कंपनीचे अधिकारी आणि नागरिकांची बैठक घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार आमदारांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत कॅन्टोन्मेंट बोर्डाला दररोज 4 लाख गॅलन पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता कॅम्प वगैरे कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवाशांना 3 दिवसातून एकदा पिण्याचे पाणी मिळणार आहे.
यापूर्वी एल अँड टी कंपनीकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाला 3 लाख गॅलन पाणीपुरवठा होत होता आणि तीन दिवसातून एकदा पाणी येत होते. मात्र गेल्या 15 दिवसापासून पाणीपुरवठ्यात प्रत्यय आला होता. आता नागरिकांना तीन दिवसातून एकदा तरी पाणी मिळावे यासाठी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या सक्त सूचनेवरून कॅन्टोन्मेंट विभागासाठी 4 लाख गॅलरी पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे कॅम्प परिसरातील पाणीपुरवठ्यात पुन्हा व्यत्यय येऊ नये यासाठी देखभालीमध्ये कांही अडचणी असतील तर त्या दूर केल्या जाव्यात.
दुरुस्तीची कामे वेळच्यावेळी केली जावी अशी सूचनाही आमदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे. या पद्धतीने पिण्याच्या पाण्याची सोय केल्याबद्दल कॅम्पसह कॅन्टोन्मेंट भागातील रहिवाशांनी आमदार ॲड. अनिल बेनके यांना धन्यवाद दिले आहेत.