मध्यवर्ती बस स्थानकाकडून आरटीओ सर्कलकडे येतानाचा किल्ला तलावानजीक असलेल्या शहरातील पहिल्या बस स्टॉपची अवस्था धोकादायक बनली असून त्याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
सदर बस स्थानकाला शहरातील पहिला बस स्टॉपच म्हटला पाहिजे, कारण मध्यवर्तीय बस स्थानकातून शहरात येणारी प्रत्येक बसगाडी पहिल्यांदा या बस स्टॉपवर थांबते. महापालिकेसह संबंधितांचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे शहरातील हा पहिल्या बस स्टॉप सध्या धोकादायक स्थितीत पोहोचला आहे.
या बस स्टॉपचे पत्रे गंजले असून दर्शनीय छत कोसळण्याच्या अवस्थेत आहे. गंजक्या पत्र्याची एक पट्टी तर थेट बस स्टॉप समोरच लोंबकळत आहे. हा गंजका पत्रा बस पकडण्यासाठी धावपळ करणाऱ्या प्रवाशांसाठी अपायकारक ठरू शकते.
एका बाजूला मोठे भगदाड पडून छताची दुरावस्था झालेला हा बस स्टॉप पहिलाच असल्यामुळे या ठिकाणी सतत बसेस येत असतात. परिणामी प्रवाशाला फार वेळ थांबावे लागत नसल्यामुळे स्टॉपवर आसन व्यवस्था ही करण्यात आलेली नाही.
छत गंजून मोडकळीस आल्यामुळे अलीकडे प्रवासीवर्ग बसच्या प्रतीक्षेत बस स्टॉपपासून दूर किल्ला तलावाच्या सिग्नल पाशी थांबलेले पहावयास मिळतात. सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात त्यांच्यासाठी ते गैरसोयीचे ठरत आहे. तरी या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन सदर बस स्टॉपची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.