सीमाभागात ग्रामपंचायतीचे सर्व कारभार कन्नडमध्येच करण्यात यावेत, असा आग्रह जिल्हा पंचायत सीईओ दर्शन यांच्याकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती कन्नड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ टी एस नागाभरण यांनी सांगितले आहे.
सीमा भागातील मराठी भाषिकांना मातृभाषेच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यासाठी सरकारच्या मदतीने कन्नड संघटना करत असल्याचे दिसून येत आहे.
रविवारी सरकारी विश्राम गृहात कन्नड संघटना आणि कन्नड विकास प्राधिकरण यांची बैठक झाली. त्यावेळी मराठीच्या नावाने शंख करण्यात आला. सीमाभागातील मराठी लोकांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीत कन्नड भाषा सक्ती करण्यात यावी.
सर्व कागदपत्रे, पत्रव्यवहार कन्नडमध्येच करण्यात यावा, असा आग्रह कन्नड संघटनांनी केला. त्यावर डॉ नागाभरण यांनी याबाबत जिल्हा पंचायत सीईओ दर्शन यांच्याशी बैठक करणार असल्याचे सांगितले.
सरकारी शाळेत पहिली ते आठवी पर्यंत कन्नड प्रथम भाषा असावी. कोणत्याही शिक्षण संस्थेत कन्नड टाळता येऊ नये, कन्नड झेंडा फडकवणे, कन्नड नामफलक उभारणे, याबाबत शिक्षण मंत्री, महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.