आऊट लूक या सुप्रसिद्ध मासिकाने देशभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांची रँकिंग अर्थात क्रमवारी जाहीर केली असून त्यामध्ये बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेने (बीम्स) 12 वा क्रमांक पटकावला आहे.
या बाबत बीम्सने जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांना दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आऊट लूक या मासिकाने आपल्या आय केअर शीर्षकाखाली जाहीर केलेल्या देशातील सरकारी वैद्यकीय संस्थांच्या क्रमवारीत बेळगावच्या बीम्स संस्थेने 12 वे स्थान प्राप्त केले आहे.
आऊट लूक मासिकाच्या रँकिंगनुसार बिम्सला शैक्षणिक दृष्ट्या सहावे स्थान, मूलभूत सुविधांच्या बाबतीत पाचवे स्थान आणि प्रशासकीय व प्रवेशाच्या बाबतीत 12 वे स्थान प्राप्त झाले आहे.
या पद्धतीने बिम्सच्या स्वरूपात बेळगावचे सरकारी हॉस्पिटल आता देशभरात सुपरीचीत होण्यास प्रारंभ झाला आहे. आता भविष्यात देशात 5 वा क्रमांक पटकाविण्याचा मानस असलेल्या बीम्स प्रशासनाकडून त्या अनुषंगाने पावले उचलण्यात येत आहेत. बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी देखील नजिकच्या काळात बिम्सला देशात पाचव्या क्रमांकावर आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध करून देण्याबरोबरच तत्पर दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात करण्याव्दारे बीम्सने आत्तापासूनच आपली क्रमवारी सुधारण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे.