रायचूर -बाची राज्य महामार्गावरील (एसएच -20) बेळगाव ते सांबरा दरम्यान सहा पदरी आणि चौपदरी रस्त्याच्या निर्मिती संबंधात स्वतंत्रपणे चर्चा करून तातडीने मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.
सुवर्ण विधानसभेत येथे काल मंगळवारी झालेल्या कर्नाटक विकास कार्यक्रमाच्या (केडीपी) 2022 -23 सालातील पहिल्या तिमाही बैठकीमध्ये ते बोलत होते. बेळगाव -सांबरादरम्यान सहापदरी आणि चौपदरी रस्त्यासाठी संबंधित प्रस्तावाची छाननी करून लवकरात लवकर मंजुरी दिली जाईल.
येथील सहा पदरी रस्त्यासाठी 112 कोटी रुपये आणि चौपदरीकरणासाठी 84 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान बेळगाव ते सांबरा रस्ता सहा पदरी करायचा की चौपदरी? हे अद्याप निश्चित व्हावयाचे असल्याने हा प्रकल्प तूर्तास मंजूर झालेला नाही. सदर रस्त्याचे चौपदरीकरण करावयाचे झाल्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील जमिनीची गरज भासणार आहे.
केडीपी बैठकीत पुढे बोलताना जिल्हा पालकमंत्री कारजोळ यांनी रोहयो योजनेअंतर्गत शाळांसाठी कंपाऊंड, फ्लोरिंगसह सर्व कामे मार्गदर्शक तत्वानुसार केली जावीत. उपचारासाठी आवश्यक औषधे, साप व कुत्रा चावल्यास आवश्यक इंजेक्शनचा पुरवठा केला जावा.
बीम्स देशातील 12 वे सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालय म्हणून उदयास आले आहे असे सांगून या संस्थेत वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह सर्व पायाभूत सुविधा व व्यवस्था पुरविल्या जाव्यात असे सांगितले. बैठकीस मंत्री उमेश कत्ती, आमदार लखन जारकीहोळी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी, दुर्योधन ऐहोळे, पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या, पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील आदींसह अन्य लोकप्रतिनिधी व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.