बेळगाव शहर आणि परिसरातील बळ्ळारी नाला व लेंडी नाल्याची लवकरात लवकर साफसफाई करावी. त्याचप्रमाणे नाल्याच्या पुरामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री आणि पाटबंधारे मंत्र्यांसह संबंधित सर्वांकडे केली आहे.
दमदार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील हजारो एकर शेत जमिनीतील पिके खराब होऊन नुकतेच कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमा झालेल्या हताश शेतकऱ्यांनी आज मंगळवारी सकाळी शेतकरी नेते नारायण सावंत, सुनील जाधव आदींच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीची निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव शहरातील लेंडी नाला आणि शहराबाहेरील बळ्ळारी नाला हे नाले साफसफाई अभावी तुंबत असल्यामुळे परिसरातील शेत पिकांना मोठा फटका बसत आहे. या नाल्यामुळे शहरात आणि शहराबाहेरील परिसरात तसेच बेळगावपासून मुचंडीनजीकच्या रेल्वे मार्गाच्या ठिकाणी मोठी समस्या निर्माण होत आहे. या नाल्यांची समस्या इतकी गंभीर आहे की दरवर्षी शेतकऱ्यांना एकरी सुमारे 1 कोटी रुपये नुकसान सहन करावे लागत आहे.
या नुकसानीची कारणे सांगायची झाल्यास बळ्ळारी नाला व लेंडी नाला या नाल्यांमधील गाळ, केरकचरा, जलपर्णी, झाडेझुडपे वेळच्यावेळी काढून नाल्यांची सफाई केली जात नाही. परिणामी पावसाळ्यात पाणी निचऱ्यास जागा नसल्यामुळे हे नाले तुंबून पाणी पात्र बाहेर येते. लेंडी नाला राष्ट्रीय महामार्ग आणि जुन्या पी. बी. रोड यांच्या मध्यभागी स्वच्छते अभावी तुंबतो. येथील राष्ट्रीय मार्गाच्या ठिकाणी असलेली भुयारी गटारे गाळ आणि केरकचऱ्यामुळे ब्लॉक झाली आहेत.
बळारी नाल्याची सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे येळ्ळूर रोड ब्रिजपासून गोकाक रोड नजीकच्या मार्कंडेय नदीपर्यंत गेल्या 15-20 वर्षात साफसफाई स्वच्छता करण्यात आलेली नाही. प्रथमतः नाला परिसरातील उपजलमार्गांचा देखील विकास करण्यात आलेला नाही. मुचंडी गावानजीक जो रेल्वे मार्ग आहे तो परिसर खडकाळ डोंगराचा असल्यामुळे येथे पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आणि सांडपाणी तुंबून राहते. यामुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. संबंधित सरकारी खात्याकडून योग्य प्रकारे विकास कामे राबविले जात नसल्याने हा प्रकार घडत आहे.
संबंधित नाले तुंबून पूर परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे दरवर्षी या भागातील कृषी क्षेत्राचे एकरी 1 कोटी रुपयांपर्यंत नुकसान होत असते. नाल्याची साफसफाई वेळच्यावेळी केली जात असल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे लक्षात घेऊन संबंधित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जावी. नालासफाईसह नुकसान भरपाईच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांचा शेती व्यवसायातील रस कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे शेतकरी अन्य क्षेत्राकडे वळल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. बळ्ळारी नाला व लेंडी नाल्याच्या सफाई संदर्भात आम्ही दरवर्षी संबंधित खात्याकडे मागणी करून देखील अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी गेल्या वर्षी पावसाळ्यात शेतजमिनींसह बेळगाव शहरातही पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तेंव्हा यावर्षी तसा प्रकार घडू नये यासाठी युद्ध पातळीवर दोन्ही नाल्यांची साफसफाई केली जावी. त्याचप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी. सदर मागणीची लवकरात लवकर पूर्तता न झाल्यास आम्हाला जनहित याचिका दाखल करून न्यायालयात दाद मागावी लागेल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी शेतकरी नेते नारायण सावंत, सुनील जाधव आदिमसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, पाटबंधारे मंत्री, कृषी मंत्री, रेल्वे राज्यमंत्री, जिल्हा पालक मंत्री, उपजिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, बेळगाव तहसीलदार, लघुपाटबंधारे खाते बेळगाव, बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके, कृषी खाते आणि बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनाही धाडण्यात आले आहे.