फेसबुकवर फेक अकाउंट काढून पत्रकार, महिला, नागरिक यांची बदनामी करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे केली आहे.
शुक्रवार दिनांक 29 जुलै 2022 रोजी बेळगाव पोलीस आयुक्त डॉ. एम बी बोरलिंगय्या यांची पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन काही फेसबुक अकाउंटची चौकशी करा अशी मागणी केली. या विषयी पत्रकार संघटनेच्या वतीने बेळगावच्या सायबर पोलिस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
बेळगाव शहरातील अनेक वेब पोर्टलना या फेक अकाउंट वरून बुद्धीभ्रम करणाऱ्या संदेशाचा नाहक त्रास होत आहे. काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या,समाजकंटक लोकांनी फेसबुक वर खोटी अकाउंट काढून बदनामीकारक मजकूर प्रस्तुत केला जात आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडत आहे अशा अकाउंटवर कडक कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले.
बेळगावातील सोशल मीडियाद्वारे काम करणाऱ्या पत्रकारांना अशा खोट्या फेसबुक अकाउंटमुळे कसा अडचणींचा सामना करावा लागतो. यासंबंधी समग्र चर्चा पोलीस आयुक्तांशी करण्यात आली.पोलीस आयुक्त बोर्लिंगय्या यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिले.
तुषार पाटील,संकल्प पाटील एस पी, आणि सोमनाथ श्रीहरी या फेसबुक अकाउंटद्वारे प्रसारित केलेल्या आक्षेपार्य पोस्टची त्वरित पडताळणी व चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक,संस्थापक अध्यक्ष कृष्णा शहापूरकर कार्यवाह शेखर पाटील सहकार्यवाह सुहास हुद्दार, प्रकाश बेळगोजी,दीपक सुतार,कृष्णा कांबळे,महेश काशीद उपस्थित होते.
फेक प्रोफाइल काढून फसवणूक होण्याच्या वाढत्या घटनांच्या काळात फेक फेसबुक अकाऊंटसवर कारवाईची मागणी करून जिल्हा मराठी पत्रकार संघाने एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे त्यामुळे आता भविष्यात फेक अकाउंट काढणाऱ्याना चाप बसणार हे निश्चित आहे.