बेळगाव जिल्हा प्रशासनाने आणखी एका वादाला निमंत्रण दिले असून याला राणी चन्नम्मा यांच्या राजवाड्याची प्रतिकृती असणारी राजवाडा इमारत कारणीभूत ठरली आहे.
वीर राणी कित्तूर चन्नमा यांच्या राजवाड्याची प्रतिकृती असणारी इमारत कित्तूर किल्ल्याशेजारी बांधण्यात यावी अशी मागणी असताना सदर इमारत तालुक्यातील बच्चनकेरी गावामध्ये बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बच्चनकेरी येथे किल्ल्याच्या स्वरूपात राजवाडा बांधण्यासाठी 57 एकर जमीन वापरली जाणार आहे. राजवाड्यासाठी सरकारी जागा कित्तूर प्राधिकरणाला उपलब्ध करून द्यावी यासाठी सरकारकडून जिल्हाधिकारी आणि बैलहोंगल उपविभागाधिकाऱ्यांना पत्र धाडण्यात आले आहे. या संदर्भात कांही आक्षेप असेल तर समर्थनीय कारण दिले जावे असेही पत्रात नमूद आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीला सार्वजनिक आणि नागरिकांनी आक्षेप घेतला असून प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे.
या निषेधाबरोबरच बच्चनकेरी येथे कित्तूर किल्ल्याच्या प्रतिकृती स्वरूपातील राजवाडा उभारणीच्या विरोधात तसेच बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ येत्या मंगळवार दि. 2 ऑगस्ट रोजी कित्तूर बंदची हाक देण्यात आली आहे.
ऐतिहासिक कित्तूर किल्ल्याचे प्रतिरूप असणारा राजवाडा कित्तूर गावातच उभारण्यात यावा या मागणीसाठी आणि जिल्हा प्रशासनाच्या आदेशाच्या निषेधार्थ कित्तूर बंद पाळला जाणार आहे.
यावेळी भव्य मोर्चा देखील काढला जाणार आहे. त्याचप्रमाणे त्यादिवशी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून निदर्शने केली जाणार आहेत. या निदर्शनामध्ये लोकांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.