बेळगावच्या केएलई ग्रॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंटने आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षानिमित्त बाजरीचे 150 हून अधिक विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार करून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करताना केएलई संस्थेचे नांव उंचावले आहे.
बेळगावच्या केएलई ग्रॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींनी बाजरीपासून तब्बल 150 हून अधिक खाद्यपदार्थ बनविले आहेत. हा उपक्रम कलाम विश्वविक्रमामध्ये नोंदविला गेला असून या पार्श्वभूमीवर सदर पदार्थांचे प्रदर्शनासह विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी केएलई ग्रॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी बनवलेले खाद्यपदार्थ हे आरोग्यदायी पद्धतीचा अवलंब करून बनविण्यात आले आहेत. या खाद्यपदार्थांमुळे कोणताही रोग होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. या पद्धतीने बाजरीपासूनचे विभिन्न स्वादिष्ट पदार्थ बनवून कलाम विश्वविक्रम रचण्यात आला असल्याचे सांगितले.
केएलई ग्रॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्रमुख ए. व्ही. कोटीवाले म्हणाले की, या विक्रमासाठी आम्ही बऱ्याच दिवसांपासून तयारी करत होतो. आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे स्वागत करण्यासाठी आम्ही हा विश्वविक्रमी उपक्रम राबविला असे सांगून विश्वविक्रम रचण्यासाठी संस्थेच्या व्यवस्थापनाने सर्वतोपरी सहकार्य केल्याचे सांगून आपण त्यांचा आभारी असल्याचे कोटीवाले यांनी सांगितले.
कलाम वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रमुखांनी जागतिक विक्रम नोंदविल्याबद्दल बेळगावच्या केएलई ग्रॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या 73 विद्यार्थी विद्यार्थिनींची मुक्तकंठाने प्रशंसा करून अभिनंदन केले.