तीक्ष्ण हत्याराने वार करून एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना गोकाक (ता. जि. बेळगाव) तालुक्यातील कोण्णूर या गावामध्ये घडली आहे.
दुंडय्या नंदीकोळ्ळमठ (वय 42) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून तो मूळचा हुक्केरी तालुक्यातील रहिवासी आहे. गावातील रस्त्यावर अज्ञातांनी त्याच्या मानेवर तिक्ष्ण हत्याराने वार करून घटनास्थळावरून पळ काढला.
शस्त्राचा वार वर्मी लागल्यामुळे दुंडय्या अल्पावधीत जागीच गतप्राण झाला. तो हुक्केरी येथून कोण्णूर येथे आपल्या पत्नीला तिच्या माहेरी भेटण्यासाठी आला होता. मागावर असणार्या हल्लेखोरांनी रात्री संधी साधून शस्त्राने दुंडय्याची हत्या केली.
खुनाचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. खुनाची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्याबरोबरच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे धाडला.
याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी जाळे विणले आहे.