झारखंड मधील रांची येथे झालेल्या राष्ट्रीय ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावून हलगा -बस्तवाड गावची होतकरू मल्ल लक्ष्मी संजय पाटील हिने बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
बळगाव तालुक्यातील हलगा -बस्तवाड गावच्या लक्ष्मी संजय पाटील हिने राष्ट्रीय स्तरावरील ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेच्या 56 किलो वजनी गटात कांस्यपदक संपादन केले आहे. रांची येथे झालेल्या स्पर्धेत मिळालेल्या यशानंतर बेळगावमध्ये दाखल झालेल्या लक्ष्मी पाटील हिचे शहरात भव्य स्वागत करून सत्कार करण्यात आला.
हल्याळ शाळेतून दहावी पूर्ण केलेल्या लक्ष्मी पाटील हिने रांची येथील ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या चार फेऱ्यांमध्ये अनुक्रमे झारखंड, पांडेचेरी, केरळ आणि हरियाणाच्या मल्ल मुलींना पराभूत केले. त्याचप्रमाणे पाचव्या फेरीत लक्ष्मीने प्रतिस्पर्धी गुजरातच्या भूमिका हिच्यावर 5 -2 अशा गुणांनी विजय संपादन करून उपांत्य फेरी गाठली. तथापि उपांत्य फेरीमध्ये मात्र लक्ष्मीला प्रतिस्पर्धी दिल्लीच्या तमन्ना तिच्याकडून 6 -7 अशा गुण फरकाने पराभव पत्करावा लागला.
राष्ट्रीय स्पर्धेत लक्ष्मीने वरील प्रमाणे यश मिळविल्यामुळे तिच्या कुटुंबीयांना अत्यानंद झाला आहे. चार बहिणीमध्ये लक्ष्मी ही उत्तम कुस्तीपटू आहे, असे तिचे पालक अभिमानाने सांगतात. लक्ष्मी प्रमाणेच तिची आणखी एक बहीण सध्या कुस्ती शिकत आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कुस्तीचा सराव करणाऱ्या लक्ष्मी संजय पाटील हिच्या राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीमुळे तिची लखनौ येथे होणाऱ्या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली आहे.
आपल्या मुलीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे वडील संजय पाटील यांनी हर्ष व्यक्त केला असून लक्ष्मी ही पाटील घराण्याचा अभिमान असल्याचे सांगितले. लक्ष्मी सध्या कुस्ती संकुलन पुणे येथे सराव करीत असून तिला निलेश पाटील, संदीप पठारे व विजय बराटे यांचे मार्गदर्शन तर बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर तसेच युवजन सेवा आणि क्रीडा खाते हल्याळचे कुस्ती प्रशिक्षक तुकाराम गौडा यांचे प्रोत्साहन लाभत आहे.