प्रेषित महंमद पैगंबर यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एका बाजूला नुपूर शर्मा यांच्या विरोधात आंदोलन सुरू असताना दुसऱ्या बाजूला असेही कांही लोक आहेत जे त्यांना पाठिंबा देत आहेत.
यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद याचाही समावेश आहे. बेळगावात एका मशिदी बाहेर रस्त्यावर नुपूर यांच्या पुतळ्याला फाशी देण्याच्या घटनेवर भडकलेल्या प्रसादने एका पाठोपाठ एक ट्विट करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
यावर कांही लोकांनी व्यंकटेश प्रसादला टारगेट करण्याचा प्रयत्न केल्यावर प्रसादने त्यांना देखील सडेतोड उत्तर दिले आहे. नुपूर शर्मा यांच्या पुतळ्याला फाशी देण्याचा फोटो शेअर करत व्यंकटेश प्रसाद म्हणतो, हा बेळगावमध्ये नुपूर शर्माचा लटकवण्यात आलेला पुतळा आहे, विश्वास बसत नाही आहे की हा 21 व्या शतकातील भारत आहे.
मी सर्वांना विनंती करतो की राजकारण सोडा आणि थोडे जागरूक व्हा… हे थोडं अति होत आहे. त्यानंतर आणखी एका ट्विटमध्ये प्रसाद म्हणतो या परिस्थितीला बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि अशा गोष्टीना बरोबर ठरविणारे लोक देखील जबाबदार आहेत. हा फक्त एक पुतळा नाही तर अनेक लोकांसाठी धोका आहे.
माजी कसोटीपटू व्यंकटेश प्रसाद याने आणखी एका ट्विटमध्ये म्हंटले आहे की …आणि जर या गोष्टीमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जात असतील तर देशात अशा लोकांची यादी न संपणारी आहे.
जेंव्हा देशात पत्रकारांपासून ते लोकप्रतिनिधींपर्यंत आणि मुख्य वृत्तपत्रांपासून ते मुख्य चित्रपटसृष्टीतील स्टारपर्यंत हिंदू देव-देवतांची चेष्टा करतात. तेंव्हा नेहमीच सहिष्णुता दाखविली गेली आहे.