रानमांजरांची शिकार करणाऱ्या दोघा शिकाऱ्यांना कित्तूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गजाआड केले असून त्यांच्याकडील रानमांजरांचे मांस आणि शिकारीचे साहित्य जप्त केले आहे. अन्य एक शिकारी फरारी झाला असून त्याचा शोध जारी आहे.
हणमंत दुर्गप्पा होसुर आणि मल्लेश रामाप्पा हावेरी (दोघे रा. बेलवडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खानापूर वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सौंदत्ती तालुक्यातील खोदानपूर वनविभागात रानमांजरांची शिकार करणाऱ्या दोघा जणांना वनविभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
खोदानपूर येथे शिकार करून शिकार केलेल्या रानमांजराचे मांस त्यांनी बेळवडीतील हरिजन केरे येथील घरात दडवून ठेवले होते. वन अधिकाऱ्यांनी त्या घरावर छापा टाकून रानमांजरांचे मास, शिकारीसाठी वापरलेले तीन विळे, चाकू, डबे आदी साहित्य जप्त केले.
याप्रकरणी बेलवडी येथील हणमंत होसूर व मल्लेश हावेरी यांना अटक करण्यात आले असून त्यांचा अन्य एक साथीदार आरोपी फरारी आहे.
त्याचा शोध घेण्यात येत आहे. बेळगावचे डीएफओ आणि आरएफओ यांच्या मार्गदर्शनाखाली कित्तूर उप वनसंरक्षणाधिकारी संजय मगदूम वनरक्षक अजित मुल्ला, गिरीश मेक्केद, ताशिलदार आदींनी उपरोक्त कारवाई केली.