Monday, December 23, 2024

/

वादळी वारा आणि जोरदार पाऊस!

 belgaum

बेळगावात सकाळपासून उन्हाच्या झळांनी शहर तापलेले असूनही अचानक दुपारी बेळगावमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दुपारपर्यंत कडक ऊन आणि त्यानंतर बघता बघता पावसाचा वेग वाढला आणि शहर परिसरात पाणीच पाणी साचलेले दिसून आले.

बेळगाव स्मार्ट सिटी असूनही गेल्या दोन वर्षात पावसामुळे साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर अद्यापही उपाययोजना राबविण्यात आली नाही. अजूनही संपूर्णपणे पावसाळा सुरु झाला नाही. मात्र यंदा अवघ्या दोन ते तीन वेळा पडलेल्या पावसामुळे शहर परिसरातील अनेक भागातील गटारी ओव्हरफ्लो झालेल्या दिसून आल्या आहेत.

मागील पंधरवड्यात पडलेल्या पावसामुळे तसेच आज दुपार नंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक गल्ल्यांमधील गटारी ओव्हरफ्लो होऊन दूषित पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे दिसून आले. खरेदीसाठी बाजारात आलेल्या नागरिकांना मात्र या दूषित पाण्यातूनच मार्गक्रमण करायची वेळ आली.

शहरातील मध्यवर्ती भागातील मारुती गल्ली आणि नरगुंदकर भावे चौक येथील परिस्थिती मात्र नेहमीप्रमाणेच दिसून आली. गणपती गल्लीच्या वरील भागातून वाहून आलेले गटारीतील पाणी कांबळी खूट परिसरात साचल्याने नागरिकांना दूषित पाण्यातून नाकाला रुमाल लावून मार्ग काढायची वेळ आली. स्मार्ट सिटी बेळगाव म्हणून नावारूपास येत असलेल्या बेळगाव शहरात अद्यापही अनेक गोष्टी बाकी आहेत. पावसाळ्यापूर्वीच शहराची हि अवस्था पाहून पावसाळ्यातील परिस्थितीचा विचार करून नागरिकांना आतापासूनच चिंता सतावत आहे.Old pb road rain

दरवर्षी नालेसफाई, गाळ काढणे, गटारीतील कचरा काढणे असे उपक्रम राबविले जातात. मात्र तरीही बेळगावमधील अनेक परिसरात गटारी तुंबून ओहरफ्लो होण्याची समस्या जैसे थे परिस्थितीतच असल्याचे दिसून येत आहे. आज शहरात झालेल्या पावसानंतर अनेक भागात गटारीच्या पाण्यासह सखल भागात देखील पावसाचे पाणी साचलेले दिसून आले. कोविडसारख्याच महाभयंकर रोगाप्रमाणे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पावसाळ्यातच डोके वर काढतात.

परंतु या समस्येकडे मनपा प्रशासन कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील गटारी तुंबण्याची हि पहिलीच वेळ नसून या समस्येला नागरिक देखील आता वैतागले आहेत. अनेकवेळा पालिका प्रशासनाला याबाबत निवेदने देण्यात आली आहेत. मात्र आतापर्यंत हि समस्या सोडविण्यासाठी कोणीही प्रतिसाद दिला नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.