कडोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वरिष्ठ कर्मचारी आणि बेळगावच्या आंतरराष्ट्रीय महिला जलतरणपटू ज्योती कोरी (होसट्टी) यांना बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कर्नाटक सरकारी कर्मचारी संघटनांच्या क्रीडा महोत्सवाची क्रीडाज्योत प्रज्वलित करण्याचा सन्मान प्राप्त होण्याबरोबरच त्यांनी जलतरणामध्येही सुयश मिळविले आहे.
बेंगलोर येथील कंठिरवा स्टेडियम येथे गेल्या 30 मेपासून आज बुधवार दि 1 जूनपर्यंत राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या राज्यस्तरीय कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते मंडळींच्या उपस्थितीत या क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला. याप्रसंगी क्रीडा महोत्सवाची मुख्य क्रीडाज्योत प्रज्वलित करण्याचा सन्मान बेळगावच्या आंतरराष्ट्रीय महिला जलतरणपटू ज्योती कोरी (होसट्टी) यांना प्राप्त झाला होता. हा सन्मान प्राप्त होणाऱ्या ज्योती या बेळगावच्या पहिल्या महिला क्रीडापटू आहेत.
सदर सन्मानाव्यतिरिक्त ज्योती कोरी (होसट्टी) यांनी क्रीडा महोत्सवातील जलतरण प्रकारात दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकाविले. जलतरणातील महिलांच्या 100 मी. बॅकस्ट्रोक आणि 200 मी. फ्रीस्टाइल शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या ज्योती कोरी यांना 100 मी. बटरफ्लाय स्ट्रोक शर्यतीत मात्र द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
यापूर्वी गेल्या मे महिन्यात बेंगलोर येथील पदुकोण -द्रविड सेंटर येथे आयोजित पहिल्या पॅन इंडिया नॅशनल मास्टर्स गेम्स -2022 या क्रीडा महोत्सवात ज्योती कोरी -होसट्टी यांनी 4 सुवर्णपदकांची कमाई केली होती. तत्पूर्वी कोलंबो (श्रीलंका) येथील इंडो -श्रीलंकन इन्व्हिटेश्नल मास्टर्स मीट शॉर्ट कोर्स स्विमिंग चॅम्पियनशिप -2022 या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ज्योती यांनी देशाचे नांव उज्ज्वल केले होते. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्योती यांनी या स्पर्धेतील 7 जलतरण प्रकारात 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक हस्तगत केले होते.
आता राज्य कर्मचारी संघटनांच्या क्रीडा महोत्सवातील यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. जलतरणपटू ज्योती कोरी -होसट्टी या सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात पोहण्याचा सराव करतात. त्यांना प्रशिक्षक उमेश कलघटगी, सुधीर कुसाणे आणि प्रसाद तेंडूलकर यांचे मार्गदर्शन तसेच डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. विवेक सावजी, लता कित्तूर, रो. अविनाश पोतदार, माणिक कापडिया आदींचे प्रोत्साहन लाभत आहे.