मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने एका वानरावर हल्ला करून त्या वानराला अक्षरशः फाडून खाल्ले. आदर्श नगर वडगाव येथील मेघदूत कॉलनी येथे असणाऱ्या उद्याना नजीक भटक्या कुत्र्यांनी वानरावर हल्ला केला आणि त्या वानराच्या छाती आणि पोटाकडील भागाचे लचके तोडले.
याआधीही बेळगाव शहर, उपनगरं आणि ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांनी गाई-बकरी यावरच नव्हे तर शाळेत जाणाऱ्या लहान विद्यार्थ्यांवर आणि मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांवर हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
शहर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच चालली असून या भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून वारंवार केली जात असतानाही जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने नको ती कारणे सांगून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकडे हेतुपुरस्सर कानाडोळा केलेला आहे.
प्राणी दया संघटना मोकाट कुत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याने आम्ही काहीच करू शकत नाही असेही बोलले जाते.
असे असेल तर मोकाट कुत्र्यांबद्दल कणव असणाऱ्या प्राणी दया संघटना आणि महापालिका प्रशासनाला या वानराच्या जिवाबद्दल काही सोयरसुतक आहे का ? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.
शहर परिसरात उच्छाद मांडणाऱ्या मोकाट कुत्र्यांना पकडून त्याला जंगल भागात सोडावे किंवा गावाबाहेर एखादे श्वान आश्रयस्थान स्थापून त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी प्राणी दया संघटनेच्या पदाधिकार्यांकडे सोपवावी. जेणेकरून मोकाट कुत्र्यांपासून शहर परिसर मुक्त होईल आणि प्राणी दया संघटनेचे इप्सित साध्य होईल, असे विचार काही सुज्ञ नागरिकांतून पुढे आलेले आहेत.
वानरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडविलेल्या मोकाट कुत्र्यांनी एखाद्या बाल विद्यार्थ्यांचा बळी घेतल्यास त्याची जबाबदारी महापालिका प्रशासन घेणार आहे का ? अशी विचारणाही नागरिकांतून केली जात आहे.
महापालिका संबंधित विभागाने लवकरात लवकर या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना जिल्हा संघटक रवींद्र जाधव आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.