स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या धर्मवीर संभाजी चौक येथील बस थांबा याचा विकास करण्यात आला आहे. तथापि येथील बसथांबे जनावरांचे आश्रयस्थान बनल्याचे चित्र पहावयास मिळत असून यामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील ठिकाणच्या बस थांब्यांचा विकास करण्यात आला आहे. त्यानुसार धर्मवीर संभाजी चौक येथील बस थांब्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी टाइल्स वापरून चांगली आसनव्यवस्था करण्यात आली आहे.
मात्र या बस थांब्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी हे बस थांबे शहर व कॅम्प परिसरात फिरणाऱ्या भटक्या जनावरांचे आश्रयस्थान बनले आहे. भटकी जनावरे येथे दिवसभर बसून असतात. त्यामुळे एखाद्या नवख्या प्रवासी थांब्यावर गेला तर जनावरे आणि अस्वच्छता पाहून तो बस थांब्याऐवजी रस्त्यावर थांबणे पसंत करतो. जनावरांच्या वास्तव्यामुळे या बस थांब्यांवर अस्वच्छता पसरली आहे. त्याची स्वच्छता होत नसल्याने प्रवाशांनीही अशा बस थांब्यांचा वापर बंद केला आहे. प्रवासी दिसत नसल्याने बसेसही या ठिकाणी थांबत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा रस्त्यावर अन्यत्र थांबलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते.
फक्त धर्मवीर संभाजी चौक येथीलच नाही तर शहरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या बऱ्याच बस स्थानकाच्या ठिकाणी भटक्या जनावरांचे अतिक्रमण झाल्याचे पहावयास मिळते. खरेतर प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हे बस थांबे स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे प्रवाशांकडून या बस थांब्यांचा वापर होऊ शकतो.
त्या ठिकाणी दिवसभर जनावरेच बसून राहिल्यास ज्या प्रवाशांसाठी हे थांबे निर्माण केले आहेत त्या प्रवाशांवर पावसात भिजत बसची प्रतीक्षा करण्याची वेळ येणार आहे. तेंव्हा स्मार्ट सिटी व महापालिकेने भटक्या जनावरांच्या या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी प्रवासीवर्गाची मागणी आहे.