आम्ही विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक खूप गांभीर्याने घेतलेली आहे. त्यामुळे कर्नाटक वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे, असा विश्वास विधानसभेतील विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे.
बेळगाव येथे आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. बेरोजगारी, महागाई, शिक्षण क्षेत्रात कांहीही काम केले नाही म्हणून जनतेन भाजपला मतदान करावं का? असा सवाल उपस्थित करत सिद्धरामय्या यांनी नोट बंदी करून जीएसटी वाढवून या देशाची आर्थिक परिस्थिती खराब झालेली आहे हे चांगले लक्षण आहेत का आणि म्हणून त्यांना मते द्यावीत का? असा प्रतिप्रश्न सिद्धरामय्या यांनी पत्रकारांना केला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे देशावरील कर्ज 1 लाख 65 हजार कोटींवर गेलेले आहे. त्यामुळे अशांना आम्ही मत द्यावं का? याचे उत्तरे येडियुरप्पा द्यायला तयार नाहीत असेही ते म्हणाले.
नलिनकुमार कटील यांनी कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह असल्याचे सांगून डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या वादामुळेच काँग्रेस संपणार आहे असे वक्तव्य केले आहे. त्यावर आपली प्रतिक्रिया काय? असे विचारले असता सिद्धरामय्या यांनी नलिनकुमार कटिल हे कर्नाटक भाजप प्रदेश अध्यक्ष होण्याचे लायकीच नाहीत असे स्पष्टपणे सांगितले. उचलली जीभ लावली टाळ्याला या पद्धतीने ते वाट्टेल ते बडबडत आहेत. कटील हे अपरिपक्व राजकारणी आहेत, असे ते म्हणाले.
ही मंडळी पाठ्यपुस्तकांचे संपूर्ण केसरीकरण करण्यास निघाली असून विद्यार्थ्यांच्या डोक्यात ते भरवण्याचा भाजपचा अजेंडा आहे. असा आरोपही सिद्धरामय्या यांनी केला. विद्यार्थ्यांना शिक्षण देताना वैचारिक चारित्र्य पूर्ण शिक्षण देण्याची गरज आहे देशाचे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचाच धडा पाठ्यपुस्तकातून हटविणे हे संस्कृतीकरण आहे का? आपल्या देशात होऊन गेलेल्या महान व्यक्तिमत्त्वांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळणे याला संस्कृतीकरण म्हणतात का? असा सवालही त्यांनी केला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा धडा पाठ्यपुस्तकातून काढला तर मुले काय शिकणार? तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी चुका समजून घेऊन दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळेच काँग्रेसने हा वाद जास्त विकोपाला नेलेला नाही, असेही माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
आगामी 2023 सालच्या निवडणुकीत भाजप 150 ते 160 जागा जिंकणार असे वक्तव्य येडीयुरप्पा यांनी केले आहे. या संदर्भातील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्वतः बी. एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांना साधे आपल्या मुलालाही निवडणुकीचे तिकीट मिळवून देता आले नाही. त्यामुळे येत्या 2023 मधील निवडणुकांमध्ये ते 150 ते 160 जागा कशा जिंकतील? येडियुरप्पा यापुढे कधीही परत मुख्यमंत्री होणार आहेत का? आपल्या मुलाला साधे विधानपरिषदेचे तिकीट त्यांना मिळवून देता आले नाही ते काय भाजप 160 जागा जिंकणार म्हणून सांगतात, असे सिद्धरामय्या उपरोधाने म्हणाले. तसेच आपण निवडणुकीच्या प्रचारासाठी आलो आहोत. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस संदर्भात आपण कोणतीही टिप्पणी करणार नाही असेही ते म्हणाले.