लोकसंख्येच्या आधारावर कर्नाटकचे विभाजन करून दोन राज्य निर्माण करण्याचा डाव भाजपने आखला आहे, अशी टीका केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी केली.
राज्याचे वनमंत्री उमेश कत्ती यांनी बेळगावात काल बुधवारी 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात 50 नवीन राज्य निर्माण होणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. कर्नाटकचे विभाजन होऊन उत्तर कर्नाटकाचे नवीन स्वतंत्र राज्य होणार असल्याचे भाकीतही त्यांनी केले होते.
त्यावर बेळगावात आज प्रतिक्रिया देताना आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले, 3 कोटी लोकसंख्येचे एक राज्य असेल असा कायदा भाजप सरकार करणार आहे. त्यासाठी लवकरच ते मसुदाही आणतील. हा कायदा केला की आपोआप कर्नाटकात दोन राज्यं निर्माण होतील. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी देखील सूतोवाच केले होते.
छोट्या राज्यांमुळे विकास होतो का? या प्रश्नाला उत्तर देताना विकासाच्या दृष्टीने लहान राज्यं असणे बरे असते. येथे स्वतंत्र राज्य म्हणण्याचा प्रश्न येत नाही. कारण कायद्यानेच नवी राज्ये निर्माण होणार आहेत. स्वतंत्र राज्याची गोष्ट वेगळी आणि आंदोलन करून राज्य मिळवणे वेगळे.
तेलंगणाची निर्मिती स्वतंत्र राज्य म्हणून आंदोलनातून झाली. उत्तर कर्नाटक राज्यं आंदोलनातून होणार नाही. त्यासाठी भाजप कायदा आणेल. स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्य हा भाजपचा अजेंडाच आहे असे सांगून जेंव्हा ते कायदा आणतील तेंव्हा त्यावर चर्चा करू, असे आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले.