श्री गुरु आप्पासाहेब भानुदास वास्कर महाराज व श्री सद्गुरू हभप विवेकानंद ज्ञानेश्वर वास्कर महाराज पंढरपूर यांच्या कृपाशीर्वादाने आषाढी निमित्त सांबरा ते पंढरपुर पायी दिंडीला श्री हभप यल्लाप्पा संभाजी गिरमल महाराज (सांबरा) यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी मोठ्या भक्तिभावाने उत्साहात प्रारंभ झाला.
सांबरा ते पंढरपुर पायी दिंडीला फार जुनी परंपरा आहे. तथापि गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे ही परंपरा खंडित झाली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव निवळल्यामुळे सांबरा गाव आणि परिसरातील वारकरी व भक्त मंडळींनी आषाढी वारीनिमित्त यंदा मोठ्या हिरीरीने पायी दिंडीचे आयोजन केले आहे.
सांबरा गावातील पंच मंडळी व मान्यवरांच्या हस्ते आज शुक्रवारी सकाळी दिंडीचे पूजन करून पायी दिंडीला प्रारंभ करण्यात आला. टाळ-मृदंगासह विठ्ठल नामाच्या गजरात निघालेल्या या पायी दिंडीत सध्या सुमारे 200 वारकरी मंडळी सहभागी झाली आहेत.
श्री हभप यल्लाप्पा संभाजी गिरमल महाराज (सांबरा) यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पायी दिंडीतील वारकऱ्यांची संख्या दिंडी जसजशी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत राहील तसतशी वाढत जाणार आहे. पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या या पायी दिंडीचे सांबरा गावात ठिकाणी स्वागत केले जात होते.
सांबरा येथून निघालेल्या या पायी दिंडीचा आज दुपारी मोदगा मार्गे सायंकाळी सुळेभावी येथे मुक्काम असेल. त्यानंतर हुदली, अंकलगी, इरनट्टी, कडबगट्टी, गोकाक, कल्लोळी, गुर्लापुर, हिडकल, हारुगेरी, शंकरट्टी मळा, बसवेश्वर मंदिर कर्लट्टी, अथणी, लक्ष्मीवाडी, बाळेगेरी, बसर्गी, जत, शेगाव आदी गावातून अखेर मांजरी, संगेवाडी मळा, कासेगाव शाळा मठवस्ती मार्गे येत्या 8 जुलै 2022 रोजी ही पायी दिंडी पंढरपूरला पोहोचणार आहे.