१ जून १९८६ रोजी कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला रमाकांत कोंडुसकर यांनी भेट दिली.
यावरून आता सीमाभागात जोरदार चर्चा सुरु झाली असून, समितीच्या प्रवाहात रमाकांत कोंडुसकरांसारखा कट्टर हिंदुत्ववादी नेता अभिवादनासाठी उपस्थित राहिल्याने मराठी भाषिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे. समिती नेत्यांमध्ये असलेली फाटाफूट आता दूर होऊन समिती पुन्हा मूळ प्रवाहात येईल, अशी आशा आजच्या चित्रावरून दिसून आल्याने मराठी भाषिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
अनेक मोठी कामं धोरणात्मक पद्धतीने करावी लागतात. यासाठी रमाकांत कोंडुसकर यांच्यासारखी दणकट माणसे संघटनेकडे असावी लागतात. रमाकांत कोंडुसकर यांच्यासारखा नेता समितीच्या प्रवाहात आल्याने समितीला पुन्हा चांगले दिवस आले आहेत, समितीची शक्ती वाढली आहे असे जाणवत आहे.
समितीचा परीघ वाढत चाललाय. इतरत्र विखुरलेली समितीची माणसे आता पुन्हा मूळ प्रवाहात येत आहेत. अनेक मान्यवर समितीच्या बाजूने वाटचाल करत असल्याने समिती पुन्हा अधिक बलवान होत आहे, मजबूत होत आहे, अशी अनेक लक्षणे आज दिसून येत आहेत. सीमाभागातील आक्रमक व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या रमाकांत कोंडुसकर यांच्याकडे पाहिल्यास असेच चित्र दिसून येते.
हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. हुतात्मा स्मारकासाठी निधी जमा करण्याचे काम सुरु असून या कार्यासाठी अनेकांनी भरीव देणगी देऊ केली आहे. यापैकीच एक रमाकांत कोंडुसकर देखील आहेत. हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी रमाकांत कोंडुसकर यांनी सर्वप्रथम भरीव देणगी दिली ही त्यानीं समितीप्रति व्यक्त केलेली कृतज्ञता आणि समितीच्या रचनात्मक कार्यात सहभागी होण्याची पहिली पायरी म्हणता येईल.
रमाकांत कोंडुसकर हे कार्यकर्त्यांचे नेते आहेत. कार्यकर्त्यांची मोहोळ असणारा माणूस आपल्यासोबत शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते घेऊन कोणत्याही कार्यात सामील होतो. असा नेता समितीच्या मूळ प्रवाहात आल्याने समितीची ताकद दहा हत्तीच्या बलाप्रमाणे वाढेल, यात तिळमात्र शंका नाही. समिती दिवसेंदिवस मजबूत होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा हा सकारात्मक संदेश दिसून येत असून हुतात्मा दिनी हुतात्म्यांना हि खरी आदरांजली ठरेल, हे नक्की.