विमान प्रवाशांच्या गैरसोय दूर करण्यासाठी वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळातर्फे ‘एअर टू रेल अँड रेल टू एअर इन बस’ या खास बसची सोय करण्यात आली आहे. मध्यवर्ती बसस्थानक मार्गे बेळगाव विमानतळ ते बेळगाव रेल्वे स्थानक अशा या बस सेवेचा शुभारंभ आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज गुरुवारी ध्वज दाखवून ‘एअर टू रेल अँड रेल टू एअर इन बस’ या बस सेवेचा शुभारंभ केला. याप्रसंगी बेळगाव विमानतळाचे मुख्य संचालक राजेशकुमार मौर्य यांच्यासह अन्य अधिकारी आणि निमंत्रित उपस्थित होते. या बस सेवेचे मध्यवर्ती बसस्थानकापर्यंतचे भाडे 100 रुपये आणि बेळगाव रेल्वे स्थानकापर्यंत 150 रुपये असणार आहे.
सदर बस विमानतळाच्या आगमन प्रवेशद्वाराशेजारी (अराईव्हल गेट) उभी राहील. बेळगाव विमानतळाच्या सदर विशेष बससेवेचे सध्याचे वेळापत्रक चांचणी बसफेऱ्यानंतर बदलण्याची शक्यता आहे.
सध्याचे बस वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. बेळगाव विमानतळावरून रेल्वे स्थानकाकडे प्रस्थान -सकाळी 7:55, 9:15, दुपारी 4:00 आणि रात्री 9:15 वाजता. त्याचप्रमाणे बेळगाव रेल्वे स्थानकाहून विमानतळाकडे प्रस्थानाची वेळ -सकाळी 7:00, दुपारी 3:00 आणि सायंकाळी 7:45 वाजता.