रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे बेळगाव ते शेडबाळ, म्हैसूर ते बेळगाव आणि हुबळी ते दादर एलटीटी एक्सप्रेस या बेळगाव मार्गे जाणाऱ्या रेल्वे गाड्या कांही दिवसासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता अन्य रेल्वेची मदत घेऊन ये-जा करावी लागणार आहे.
सध्या लोंढा ते मिरज दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक रेल्वे वारंवार बंद केल्या जात आहेत. रेल्वे क्र. 07335 -07336 ही बेळगाव शेडबाळ पॅसेंजर स्पेशल रेल्वे शनिवार दि. 18 ते गुरुवार दि. 29 जूनपर्यंत अशी एकूण 12 दिवस बंद राहणार आहे. तसेच रेल्वे क्र. 17326 ही म्हैसूर -बेळगाव एक्सप्रेस रेल्वे गुरुवार दि. 22 ते बुधवार दि. 28 जूनपर्यंत बंद असेल.
त्याचप्रमाणे रेल्वे क्र. 17325 ही बेळगाव -म्हैसूर एक्सप्रेस रेल्वे शुक्रवार दि. 23 ते गुरुवार दि. 29 जूनपर्यंत बंद असेल. याचबरोबर रेल्वे क्र. 17317 ही हुबळी -दादर लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस गुरुवार दि. 22 ते बुधवार दि. 28 जूनपर्यंत,
तसेच रेल्वे क्र. 17318 ही दादर ते हुबळी एक्सप्रेस रेल्वे शुक्रवार दि. 23 ते गुरुवार दि. 29 जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे. नैऋत्य रेल्वेने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
दरम्यान उपरोक्त तीनही रेल्वे गाड्या बेळगाव मार्गे धावतात. बेळगावकरांसाठी शेडबाळ, मुंबई तसेच म्हैसूरला जाण्यासाठी तिन्ही रेल्वे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या रेल्वे बंद झाल्यानंतर पुन्हा लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.