स्मशानाकडे जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्यात यावा या आपल्या मागणीकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त ग्रामस्थांनी चक्क अंत्यविधीसाठी नेण्यात येणारा मृतदेहच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवून आंदोलन छेडल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली.
सौंदत्ती तालुक्यातील ऐणगी गावातील हिंदू आणि मुस्लिम स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही. यासंदर्भात अनेक वेळा जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांकडे अर्ज विनंत्याद्वारे मागणी करूनही अद्यापही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे अंत्यविधीसाठी मृतदेह घेऊन जाताना नागरिकांची मोठी गैरसोय होऊन मनस्ताप सहन करावा लागतो.
रस्त्याबाबत वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी निधन पावलेल्या अब्दुल कादर मिश्रीकोटी या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणे ऐवजी त्याचा मृतदेह घेऊन आज सकाळी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. संतप्त नागरिकांनी अब्दुलचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवून निदर्शने करत आंदोलन छेडले. तसेच स्मशानभूमीसाठी रस्त्या तयार करून देण्यात यावा अशा मागणीची निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
तत्पूर्वी पोलिसांनी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून हटवून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जावेत यासाठी आंदोलनकर्त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत जिल्हाधिकारी आम्हाला ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असे सांगून आंदोलन करते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अखेर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आपल्या कार्यालयात बाहेर पडून आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांची समस्या जाणून घेतली. तसेच लवकरात लवकर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची सोय केली जाईल, असे आश्वासन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ऐणगी येथील मृत अब्दुल खादर मिश्रीकोटी याच्या नातलग आणि ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन छेडण्यात आल्याची ही घटना चर्चेचा विषय झाली होती.