बेळगावातील पोलीस राजकीय नेतेमंडळींच्या दबावाखाली येऊन नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्याचे काम करत आहेत असा आरोप बेळगावातील वकीलांनी केला असून त्यासंदर्भात आंदोलन छेडून आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
बेळगावातील पोलीस अधिकारी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नसून नागरिकांवर भलते सलते गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी कारागृहात करत आहेत. शहरातील पोलीस अधिकारी राजकीय नेत्यांच्या हातचे बाहुले बनले असून त्यांची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानत आहेत.
राजकीय नेत्यांविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांवर चक्क खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत. एक दिवस या प्रकाराविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याची वेळ शहरवासीयांवर येणार आहे. तेंव्हा असे कांही घडण्यापूर्वी योग्य ती कार्यवाही करून सदर गैरप्रकाराला आळा घालावा, अशा आशयाचा तपशील वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे. या निवेदनाची प्रत राज्यपालांना देखील धाडण्यात आली आहे.
याप्रसंगी बोलताना बेळगाव जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष ॲड. एन. आर. लातूर म्हणाले की पोलीस जनतेला त्रास देण्यासाठी जाणून बुजून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहेत. राजकीय नेतेमंडळींच्या हातचे बाहुले बनलेले पोलिस कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन बेकायदेशीर कृत्यं करत आहेत. हा प्रकार तात्काळ थांबविला गेला पाहिजे असे सांगून राजकीय नेत्यांचे ऐकून पोलिसांनी सार्वजनिकांवर अन्याय करणे सुरूच ठेवल्यास जिल्ह्यातील सर्व संघटनांना संघटित करून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ॲड. लातूर यांनी दिला.
कांही पोलिस अधिकारी 5 वर्षे उलटून गेली तरी बेळगावतच मुक्काम ठोकून आहेत. बेळगावातून बदली होऊन गेलेल्या कांही अधिकाऱ्यांची पुन्हा दोन महिन्यांनी बेळगावात बदली झाली आहे. या अधिकाऱ्यांना बेळगावातच सेवा बजावण्यामध्ये इतका का रस आहे? याचा आपण विचार केला पाहिजे. कायद्यानुसार सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी मागणीही ॲड. एन. आर लातूर यांनी केली. राजकीय नेतेमंडळींचे ऐकून पोलीस अधिकारी सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून गजाआड करत आहेत.
या पद्धतीने पद्धतशीरपणे संबंधित कार्यकर्त्याचे भविष्य उध्वस्त केले जात आहे. यामागे कोणाचा हात आहे हे शोधून काढण्यात आले पाहिजे. हे जर असेच सुरू राहिल्यास नजीकच्या काळात तीव्र आंदोलन छेडावे लागेल, अशी प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद, राजकुमार तोपिनकट्टी, शंकर हेगडे, अर्चना मेस्त्री, कलीमुल्ला माडीवाले आदी उपस्थित होते.