घरपट्टी वसुलीसाठी कडक उपाययोजना करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी घेतला असून शहरातील ज्या मिळकतदाराने चार किंवा त्यापेक्षा जास्त वर्षापासून घरपट्टीत भरली नाही, त्यांची यादी तयार करण्याची सूचना महसूल विभागाला केली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात संबंधितांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
महापालिकेतील महसूल विभागाच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत पालिका आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांनी वरील प्रमाणे घरपट्टी थकबाकीदारांची यादी तयार करण्याची सूचना केली आहे. 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची घरपट्टीत थकीत असलेल्यांची यादी तयार करा, असे आयुक्तांनी महसूल विभागाला सांगितले आहे.
संबंधित थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात यावी असे यापूर्वी सांगण्यात आले होते. महसूल विभागाने यादीही तयार केली आहे, पण अद्याप नोटीस बजावलेले नाही. आता चार किंवा त्यापेक्षा जास्त वर्षापासून घरपट्टी न भरलेल्यांची त्यात भर पडली आहे. त्यांची यादी करून त्यांनाही नोटीस बजावण्यात येणार आहे.
स्वयंघोषित कर आकारणीत घरपट्टी थकविल्यास संबंधित मिळकत जप्त करण्याचा अधिकार महापालिकेला आहे. त्या अधिकाराचा वापर करून पालिकेकडून नोटीस बजावली जाणार आहे. या आधी देखील अनेकदा महापालिकेने थकबाकीदारांना नोटीस बजावली असली तरी मिळकत जप्त करण्याची कारवाई एकदाही झालेली नाही.
यावेळी आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांनी घरपट्टी वसुलीसाठी कडक उपायोजना करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.