विधान परिषदेच्या वायव्य शिक्षक व पदवीधर मतदार संघ तसेच कर्नाटक पश्चिम शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान आज सोमवारी सायंकाळी चुरशीच्या उत्साही वातावरणामध्ये शांततेत पार पडले आणि सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त झाले.
बेळगाव जिल्ह्यात वायव्य पदवीधर मतदारसंघासाठी 67.80% तर शिक्षक विधान परिषदेसाठी 86.72 टक्के मतदान झाले आहे.पदवीधर मतदार संघात एकूण झालेल्या 30595 मतात 21088 पुरुष तर 8707 महिला पदवीधरानी मतदान केले आहे.वायव्य शिक्षक विधान परिषदेत बेळगाव जिल्ह्यात 86.72 टक्के मतदान झाले त्यात 7547 पुरुष 3974 महिला शिक्षकांनी अश्या 11521 शिक्षकांनी मतदान केले.
सदर निवडणुकीसाठी आज दुपारी 4 वाजेपर्यंत वायव्य शिक्षक मतदारसंघात 77.70 टक्के, तर पदवीधर मतदारसंघात 57.85 टक्के मतदान झाले होते. त्याचप्रमाणे कर्नाटक पश्चिम शिक्षक मतदार संघात 81.11 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीसाठी शहरातील शहापूर येथील चिंतामणराव हायस्कूल, गणपत गल्ली येथील शाळा, विश्वेश्वरय्यानगर येथील मतदान केंद्र आदी ठिकाणी मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. या सर्वच मतदान केंद्रावर सकाळपासून मोठ्या उत्साहाने मतदान सुरू होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी सॅनिटायझर, फेसमास्क आणि सोशल डिस्टंसिंग या नियमांचे पालन केले जात होते. मतदान केंद्राच्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगसाठी मार्किंग करण्यात आले होते. जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या आणि जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करत होते. मतदान शांततेने सुरळीत पार पडावे यासाठी सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघात दुपारी 12 वाजेपर्यंत 33.56 टक्के आणि पदवीधर मतदारसंघात 24.09 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत हे मतदान अनुक्रमे 49.74 टक्के आणि 42 टक्के इतके वाढले होते. कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत यावेळी अरुण शहापूर (भाजप), चंद्रशेखर लोणी (निजद), प्रकाश हुक्केरी (काँग्रेस), आप्पासाहेब कुरणे, चंद्रशेखर गुडसी, जयपाल देसाई, एन. बी. बन्नूर, बसप्पा मणीगार, श्रीकांत पाटील, श्रीनिवासगौडा गौडर, श्रेनिक जंगटे आणि चिक्कनरगुंद संगमेश (सर्व अपक्ष) असे एकूण 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी भाजपचे अरुण शहापूर काँग्रेसचे प्रकाश हुक्केरी आणि काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार एन. बी. बन्नूर यांच्यात तिरंगी लढत अपेक्षित आहे.
कर्नाटक पदवीधर मतदार संघात सुनील संक (काँग्रेस), हनुमंत निराणी (भाजप), जे. सी. पटेल, यल्लाप्पा कलकुट्री, आदर्शकुमार पुजारी, घटगेप्पा मगदूम, दीपिका एस., निंगाप्पा बजंत्री भीमसेन बागी, आर. आर. पाटील व सुभाष कोटेकल (सर्व अपक्ष) असे 11 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज सायंकाळी मतपेटीत बंदिस्त झाले आहे.
निवडणुकीच्या मतदानासाठी बेळगाव जिल्ह्यात 95 मतपेट्या, बागलकोट जिल्ह्यात 48 आणि विजयपुरा जिल्ह्यात 47 मतपेट्या अशा एकूण 190 मतपेट्यांची व्यवस्था करण्यात आली होती. कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघात 25,388 मतदार आणि कर्नाटक वायव्य पदवीधर मतदार संघात 99,518 मतदार आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटक पश्चिम शिक्षक मतदार संघातील मतदारांची संख्या 17,973 इतकी आहे.